मलनिस्सारण केंद्राच्या खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:07 AM2021-01-02T04:07:08+5:302021-01-02T04:07:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविला जात असून, चव्हाण कॉलनी येथे उदचन केंद्र बनविण्यात येणार असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविला जात असून, चव्हाण कॉलनी येथे उदचन केंद्र बनविण्यात येणार असून, त्यासाठी ३० फूट खड्डा खणला आहे. शुक्रवारी दुपारी जवळच्या झोपडपट्टीतील दोन लहान मुले खेळत होती. या दोघांचा तोल जाऊन ती खड्ड्यात पडली. इमारतीचे काम सुरू असलेल्या मजुरांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, यात गौसिया आरिफ शेख (वय ३) हिचा मृत्यू झाला, तर रेहान शेख (वय ५) याला रुग्णालयात दाखल केले आहे.
ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून भुयारी गटार व ठिकठिकाणी उदंचन केंद्र बांधली जात आहेत. मात्र, हे काम करताना कंत्राटदारासह पालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना राबविल्या नाहीत. चव्हाण कॉलनी येथे केंद्रासाठी ३० फूट खड्डा खणला आहे. कोरोना काळात काम बंद असल्याने, या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी ही दोन मुले खेळत असताना ही घटना घडली. ही मुले पाण्यात पडल्याचे तेथे जवळच काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढून इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी गौसिया हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, तर रेहान याच्यावर उपचार सुरू आहेत, या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत फौजफाट्यासह घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली.
काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षारक्षक ठेवणे गरजेचे असताना, ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडली. यामुळे कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.