China Coronavirus : चीनच्या वुहानमध्ये अडकलेले 'ते' ३६ प्रवाशी महाराष्ट्रात परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:11 IST2020-02-19T19:11:05+5:302020-02-19T19:11:29+5:30
१९ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले आहेत

China Coronavirus : चीनच्या वुहानमध्ये अडकलेले 'ते' ३६ प्रवाशी महाराष्ट्रात परतले
मुंबई - फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनमधील वुहान शहरामधून एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या ६४५ भारतीयांना दिल्लीच्या आयटीबीपी आणि मानेसर आर्मी कॅम्प मधील विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवण्यात आले होते. त्यातील ३६ जण महाराष्ट्रातील असून त्यांचा कोरोनासाठी चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आणि त्यांचा विलगीकरण कक्षातील कालावधी संपल्याने ते आज महाराष्ट्रात परतले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या सर्वांच्या प्रयोगशाळा चाचण्या कोरोना आजारासाठी निगेटिव्ह आल्या आहेत. आपला विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतत आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील १४ दिवसांकरिता पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
१९ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून २६६ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ७० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे.
आजवर भरती झालेल्या ७१ प्रवाशांपैकी ६९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या २ जण मुंबईत भरती आहेत. दरम्यान बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २६६ प्रवाशांपैकी १४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.