मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रसार टाळायचा असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ हस्तांदोलन (हँडशेक) टाळण्याचा सल्ला सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिला. भारतीय संस्कृतीत नमस्काराची, हात जोडून राम राम म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे काही काळ शेकहँड ऐवजी नमस्कारवरच भर देण्याचा सावधगिरीचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला.
कोरोना व्हायरसबाबत सभागृहात सकाळच्या विशेष सत्रात नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी घ्यायच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. कोरोना व्हायरसचा नेमका उगम अद्याप समजलेला नाही. मात्र हा प्राणीजन्य व्हायरस असल्याचा अंदाज लावला जात आहे.
कोरोनाचे लक्षणेही इतर व्हायरसप्रमाणेच आहेत. न्युमोनिया, किडनी फेल्यूअर असे गंभीर लक्षणे आहेत. ज्यामुळे रुग्ण दगावू शकतो. व्हायरस शरीरात आल्यानंतर शरीरातील अँटीबॉडीज त्याला नष्ट करतात. कोरोनाच्या उपचाराबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. आपल्या शरीरातील इम्युनिटीच व्हायरसचा प्रतिकार करु शकते. कोरोनाच्या बाबतीत दोन टेस्ट जाणीवपूर्वक घेतल्या जातात. त्या निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णाला सोडले जाते. वृद्ध, हायपरटेन्शन असलेले आणि ज्यांची इन्युनिटी पॉवर कमी आहे, अशा लोकांना या व्हायरसचा धोका जास्त आहे.
शिंकलो, खोकलो तर त्यातून हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो. रुग्णाशी हस्तांदोलन केल्यास कोरोनाची लागण होऊ शकते. सर्दी, खोकला याबाबत जे आपले एटिकेट्स आहते, त्याप्रमाणे शिंकल्यानंतर रुमाल वापरला पाहीजे. १०४ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करुन दिला आहे. पुण्यात कंट्रोल रुम पुण्यात स्थापन केले आहे. मास्कची साठेबाजी आणि वाढीव दराने विक्री केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येईल, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
मास्क सर्वांनी वापरण्याची आवश्यकता नाही. जे बाधित आहेत किंवा बाधीत रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंनी मास्क वापरावा. एम ९५ हा मास्क तर लोकांनी वापरण्याचा विषयच नाही. ट्रिपल लेयर मास्क हा देखील बाधित जालेल्या रुग्णासाठीच आहे. इतर लोकांनी साधा रुमाल जरी रोज धुवून वापरला तरी चालेल, असे टोपे म्हणाले.
अफवा पसरविल्यास कडक कारवाई
कोरोना व्हायरसबाबत समाज माध्यमात चुकीची माहिती पसरवली जात आहे. कोणी म्हणते चिकन खाल्यावर होतो, कोणी म्हणत फळ विशेषतः ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यावर कोरोना होतो. ज्याला जी कल्पना सुचेल ती समाजमाध्यमात पसरवीत आहे. अशा मेसेजेसला आळा घालण्यासाठी सायबर क्राईमच्या महासंचालकांशी चर्चा आहे. अशा मेसेजस् च्या मुळाशी जाऊन अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
corona virus : भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प
Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा
विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप
Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप