चीन हा भारताचा स्पर्धक नव्हे तर शत्रू आहे : दुष्यंत सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:18+5:302021-06-01T04:06:18+5:30
मुंबई : चीन हा भारताचा एक क्रमांकाचा शत्रू असूनदेखील देशातील काही राजकारणी तसे मानायला तयार नाहीत. त्यांच्या मतानुसार चीन ...
मुंबई : चीन हा भारताचा एक क्रमांकाचा शत्रू असूनदेखील देशातील काही राजकारणी तसे मानायला तयार नाहीत. त्यांच्या मतानुसार चीन हा आपला स्पर्धक असल्याचे सांगितले जाते. माओवादी, डावे, लिबरल म्हणवणारे अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, ते अयोग्यच आहे आणि ही अतिशय खेदाची बाब आहे. चीन आपला स्पर्धक असल्याचे विधान करणे म्हणजे आपल्या जवानांनी केलेल्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे.
अमेरिका आपल्या एका सैनिकाचा अपमान झाला तर त्या शत्रुला संपवण्यासाठी अन्य देशात जाऊन लढाई करते. गलवान घाटीत २० जवानांनी बलिदान दिले आहे, ते सहजासहजी विसरायचे का? जे राष्ट्रवादी, राष्ट्रहितासाठी काम करीत आहेत, ते ही घटना विसरणार नाहीत. असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन मुलाखतीत ते बोलत होते.
स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी ग्रे वॉरफेअरबद्दल ते म्हणाले की, दहशतवादी व माओवादी संघटनांच्या विरोधात तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराने खासगी संघटनांचा वापर केला होता. मात्र, आपल्याकडील अनेक त्रुटींमुळे तो यशस्वी झाला नाही. मुळात त्यासाठी आपली धोरणे नीट करायला हवीत. शत्रूच्या शिबिरात घुसून काम करण्याची चाणक्याची नीती वापरायला हवी, तशा प्रकारचे अवलंबनही आपण करायला हवे. लष्कराव्यतिरिक्त असलेल्या संस्था, संघटना वा खासगी लष्कर किंवा तशी माणसे यांचा वापर करायला हवा.
चीनच्या गुप्तहेर संस्थेबाबत फार माहिती नसते. मात्र, चिनी गुप्तहेर संस्था सक्रिय आहेत. त्यांच्या सरकारने परदेशस्थ चिनी नागरिकांनी चीनसाठी माहिती गोळा करावी, असा कायदाही संमत केला आहे. मात्र, भारत नैतिकता पाळणारा असल्याने तसे करीत नाही. अमेरिकेचे एक एफ १६ विमान चिनी हद्दीत कोसळले होते. ते चीनने परत केले नाही, उलट त्याचा वापर करून त्यांची प्रणाली त्यातून अभ्यासून स्वतःचे एक लढावू विमान तयार केले. भारत तसे करीत नाही. आपण स्वत:च स्वत:ला मोठे करावे, या वृत्तीचे भारतीय आहेत. विमानक्षेत्रात आपल्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच महत्त्वाची चाचणी केली. तेजस विमाने आपण पूर्ण स्वदेशी ठरू, अशा अपेक्षेपर्यंत आपल्या संशोधकांनी काम केले आहे. त्यामुळे आपण काही चोरून न करता कायदेशीर कृतीच करू, असे त्यांनी सांगितले.