मुंबई – देशावर एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे सीमेवर चीनचं संकट यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ज्यावेळी देशात अनेक वर्ष आपला मित्र कोण, शत्रू कोण याचा विचार करतो त्यावेळी भारतीय मनात शत्रू म्हणून पहिल्यांदा पाकिस्तान येतं. पण देशाला पाकिस्तानपासून खरी चिंता नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सामनाला दिलेल्या मुलाखतीत (Sharad Pawar Interview with Sanjay Raut) शरद पवार म्हणाले की, पाकिस्तान आपल्या विचारांचा नाही ही गोष्ट खरी, पाकिस्तान देशाच्या हिताविरोधात पावलं टाकतो. पण लॉँग टर्मच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या हिताबाबत संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन आपल्या देशाच्या दृष्टीने मोठं संकट आहे. चीनपासून आपल्याला होणार उपद्रव हा साधासुधा नाही असं पवार म्हणाले.
त्याचसोबत पाकिस्तानची लष्करी शक्ती आणि चीनची लष्करी शक्ती यांच्यात जमीन-आसमानचा फरक आहे. आज आपली लष्करी ताकद, हवाई दल, नौदल, सैन्यदल आणि शस्त्रास्त्र-स्फोटकं यांची चीनची तुलना केली तर कदाचित दहाला एक असं प्रमाण पडू शकेल. आपल्यापेक्षा दहापटीने अधिक त्यांच्याकडे या गोष्टी आहेत. हे त्यांनी वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न करुन निर्माण केलं आहे. त्यांचे भारत या देशावर कधी लक्ष नव्हते, आधी ती त्यांची पॉलिसी होती, चित्र आता अगदी अलीकडे बदललंय असं पवारांनी सांगितले.
चीनबाबत काय भूमिका घ्यावी?
आपल्या २० जवानांची हत्या चीनने आपल्या हद्दीत घुसून केली हा चिंतेचा विषय आहे या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, याबद्दल आपल्याला निश्चितच कडक भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती भूमिका आपण वेळच्या वेळीच घेण्याची आवश्यकता असते. ती या परिस्थितीत घ्यायला कदाचित विलंब लावला की काय असं वाटतं. यात राजकारण आणू नका, त्याचं कारण म्हणजे हा प्रश्न इतका गंभीर आहे. उद्या आपण सांगितले की, फोर्स पाठवा, हल्ले करा, करु शकतो पण त्या हल्ल्याला जे उत्तर दिलं जाईल आणि त्याची किंमत जी संपूर्ण देशाला घ्यावी लागेल तीसुद्धा दुर्लक्षित करु नये. त्यामुळे हल्ल्याचा वेळप्रसंग आला तर विचार करता येईल. पण हल्ला करण्याच्या ऐवजी निगोशिएशनच्या माध्यमातून डिप्लोमॅटिक चॅनेलने जगातल्या अन्य देशांचे प्रेशर त्यांच्यावर आणून, युनायटेड नेशनसारख्या संस्थेचा दबाव आणून जर याच्यातून काही मार्ग निघत असेल तर तो प्रयत्न पहिल्यांदा करणे शहाणपणाचं आहे असं ठाम मत शरद पवारांनी मुलाखतीत मांडले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत
सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल
शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...
पाहा व्हिडीओ