लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्या क्षेत्रात चीन त्रास देण्याचा प्रयत्न करील, त्या क्षेत्रात आपणही त्यांना जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. त्यांनी आर्थिक युद्ध केले, नक्षलवाद्यांना, दहशतवाद्यांना मदत केली. सायबर हल्ले केले तर आपणही त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यायला हवे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात मांडले.
महाजन म्हणाले की, आजकाल बहुतांश प्रणाली डिजिटल असतात. इंटरनेटशिवाय आपण राहू शकत नाही. हे हल्ले साधारण इंटरनेटद्वारे होतात. यामुळेच आपण आपली प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी तशी दक्षता घ्यायला हवी. आपल्या देशात यासाठी लष्करी स्तरावर तीनही सुरक्षा दलांसाठी एक विभाग कार्यरत असतो. शहरी स्तरावरही तशा संस्था आहेत. नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन, नॅशनल क्रिटिकल इन्फर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर आणि सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (सीईआरटी) यांचा त्यात समावेश आहे. या संस्था सायबर हल्ले झाल्यास वा होऊ नये, यासाठी वा त्या अनुषंगाने काम करीत असतात. सायबर युद्धाची व्याप्ती मोठी आहे, असेही ते म्हणाले.