विद्यार्थी, उद्योजक यांना चीन गुप्तहेर म्हणून वापरते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:23+5:302021-03-22T04:06:23+5:30
मुंबई : चीनची गुप्तचर संस्था वा चिनी गुप्तहेर हे साधारण अपारंपरिक पद्धतीने काम करतात. अन्य देशांच्या तुलनेत यांची कार्यपद्धती ...
मुंबई : चीनची गुप्तचर संस्था वा चिनी गुप्तहेर हे साधारण अपारंपरिक पद्धतीने काम करतात. अन्य देशांच्या तुलनेत यांची कार्यपद्धती वेगळी आहे. चीन परदेशात असलेल्या चिनी विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, विचारवंत यांना गुप्त माहिती गोळा करण्यासाठी वापरत असते, अशी माहिती निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रविवारी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या ऑनलाइन व्याख्यानामध्ये हेमंत महाजन हे बोलत होते. सीआयएस ही चीनची गुप्तहेर संस्था आहे. त्यांच्याकडून परदेशातील विविध ठिकाणी अशा प्रकारे गोपनीय माहिती जमा करण्याचे काम केले जाते. चीनमध्ये सोशल मीडियासाठी त्यांची स्वत:ची अॅप्स असून तेथे अन्य देशांमधील म्हणजे चीनखेरीज अन्य देशात वा जगात वापरण्यात येणारी अॅप्स वापरता येत नाहीत. तसेच तेथील अॅप्स वा सोशल मीडियावर चिनी सरकारविरोधात काही लिहिताही येत नाही. चिनी नागरिक सरकारविरोधात ब्र काढू शकत नाहीत. तसेच अन्य देशातील लोकही तेथील प्रसारमाध्यमांमधील इंटरनेटवरही त्यांच्याविरोधात काही लिहू शकत नाहीत. चीनने अनेक देशांमध्ये लोकांना, शास्त्रज्ञांना, अधिकाऱ्यांना विकत घेतले आहे. त्यांच्याद्वारे ते हेरगिरी करून आपले इप्सित साध्य करतात, असे हेमंत महाजन यांनी सांगितले.
------------------
सरकारने केंद्रे बंद केली
कॉन्फ्युशिअस या चिनी तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या नावाखाली चीनने भारतात ५५ ठिकाणी केंद्रे सुरू केली होती. तेथे भारताबाबतची माहिती वा गोपनीय माहिती गोळा करण्याचेच काम केले जात होते. मात्र सरकारने आता ही केंद्रे बंद केली. अगदी मुंबई विद्यापीठातही कॉन्फ्युशिअस सेंटर चालवले जात होते. आता मात्र सर्व ठिकाणी केवळ चिनी भाषा शिकविण्याचे काम चालते.