Join us

चीनचा आर्थिक कणा मोडण्याची गरज - जी. डी. बक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाचा विषाणू हा चीननेच सोडला आहे. त्यामुळे साऱ्या जगाला मोठे आर्थिक नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाचा विषाणू हा चीननेच सोडला आहे. त्यामुळे साऱ्या जगाला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिक नसून, तो प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. चीनमधील वुहान येथील लष्कराशी संलग्न असलेल्या एका संस्थेत हे काम केले गेले आहे. त्यामुळे चीननेच ही कोरोनाची महामारी छेडली असून, ते काम २०१९ मध्येच केले गेले आहे. यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था कोलमडली आणि अनेक मृत्यूही झाले. यामुळे चीनवर कारवाई व्हायलाच पाहिजे. केवळ ढालीने किती दिवस लढणार, तलवारीचाही वापर करायलाच हवा. कोरोनामुळे बाधित झालेल्या सर्व देशांनी चीनविरोधात एकत्रित येणे गरजेचे आहे. यासाठी भारतीयांनीही एकत्रित आले पाहिजे आणि जनसहभाग वाढवून चीनच्या वस्तूंवर बंदी घालून, चीनचा आर्थिक कणा मोडण्याची गरज असल्याचे मत निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी व्यक्त केले.

सावरकर स्मारकाने शुक्रवारी आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘कोविड १९-एक खौफनाक खुलासा’ या विषयावर ते पुढे म्हणाले की चीनच्या लष्करी तत्त्वांवर आधारलेल्या एका पुस्तकात जैविक युद्ध संकल्पना समाविष्ट आहे. जैविक साधनांचा वापर कसा करता येतो, त्याने काय होते, काय घडू शकते आदी माहिती त्यात दिली आहे. १९९९ मध्येही दोन चिनी कर्नलनी अनियंत्रित युद्धपद्धती संबंधातील एक पुस्तक लिहिले होते. त्यात अमेरिकेसारख्या महाशक्तीशी लढायचे झाल्यास कोणत्याही प्रकारची साधने चालतील, ती लष्करीच नव्हेत त बिगरलष्करीही असू शकतात. त्यात विजय मिळणे व मिळवणे महत्त्वाचे असते, असे या चिनी कर्नल्सनी सांगितले होते.

चीनच्या कृत्याबाबत तुलना करताना ते म्हणाले की, हिटलरकडेही जैविक साधने होती; मात्र त्यानेही दुसऱ्या महायुद्धात त्याचा वापरही केला नव्हता; परंतु चीनच्या या कोरोना विषाणूमुळे जगातील विविध देशांमध्ये लोकांना प्राण गमवावे लागले. उद्योगधंद्यांची आणि आर्थिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली. पाकिस्तानातही जैविक प्रयोगशाळा चीनने सुरू केली असून, तेथेही भारताविरोधात काम केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. चीनचे लष्कर, त्यातील चार वर्षांची सक्तीची सेवा यामुळे तेथील सैनिक हेच मुळात लढण्यासाठी तयार नसतात. माहिती लक्षात घेऊन चीनने म्हणूनच सैनिकांऐवजी अशा जैविक साधनांचा युद्धासाठी वापर सुरू केला असल्याचा दावाही त्यांनी केला.

..............................