Join us

चेंबूरमध्ये अवतरले चीनमधील ‘पांडा व्हिलेज’!

By admin | Published: September 08, 2016 3:49 AM

देशातील विविध प्रार्थना स्थळांचे हुबेहुब देखावे सादर करुन मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणाऱ्या चेंबूरच्या सह्याद्री क्रिडा मंडळाने यावर्षी चीन मधील पांडा व्हिलेजचा देखावा उभा केला

मुंबई: देशातील विविध प्रार्थना स्थळांचे हुबेहुब देखावे सादर करुन मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणाऱ्या चेंबूरच्या सह्याद्री क्रिडा मंडळाने यावर्षी चीन मधील पांडा व्हिलेजचा देखावा उभा केला आहे. खास लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी याठिकाणी पांडा प्राण्यांच्या मोठ-मोठ्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. बच्चेकंपनीही ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.याआधी पुण्यामधील शनिवार वाडा, दिल्लीतील लाल किल्ला, लहान मुलांसाठी डिज्ने लँड आणि प्रती वाराणसी अशा विविध प्रतिकृती आणि देखावे मंडळाने साकारले आहे. २०१३ साली चित्रपट सृष्टीला शंभर वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने मंडळाने उभारलेला फिल्म सीटीचा देखावा विलोभनीय होता. यावर्षी देखील काहीतरी वेगळे साकारण्याचा मानस असल्यानेच पांडा व्हिलेज उभारल्याचे मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यांपासून १०० कामगार या प्रतिकृतीसाठी अहोरात्र काम करत असल्याचे कला दिग्दर्शक प्रसंजीत चंदा यांनी सांगितले. ते म्हणाले की, देखाव्यात विविध प्रजातीच्या पांडा प्राण्याच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. मुलांना बाहेरून हा देखावा जितका नयनरम्य वाटतोय, त्याहून कैक पटीने अधिक मजेशीर देखाव्यात प्रवेश केल्यावर वाटेल. संपूर्ण पांडा व्हिलेज हे १५० फूट लांब आणि ८० फूट रूंद जागेत साकारण्यात आले आहे. (प्रतिनिधी)