मुंबई : सिरमच्या माध्यमातून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला लस मिळणार आहे. परंतु त्या सिरम इन्स्टिट्यूटलादेखील आग लागल्याचा प्रकार समोर आला. परंतु ही आग लागण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचा तपास केला गेला पाहिजे. परंतु ही आग लावण्यामागे चीनचा हात असावा, असा आरोप निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केला. जैविक महायुद्धाच्या विरोधात जगाला हिंदुस्थानची मदत या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शुक्रवारी आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.२६ जानेवारीला जेथे राष्ट्रध्वज फडकविला गेला, तेथे आंदोलकांनी रणकंदन माजवले, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. राजपथवर सैन्य दलांचे संचलन होत होते तिकडे याच शस्त्रांचा वापर न करण्यासाठी आपली हतबलता होती. चाणक्यनीतीनुसार अंतर्गत शत्रू हा फार धोकादायक असतो. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टीचा प्रत्यय आता येताना दिसत आहे. अंतर्गत शत्रू किती भयानक असतो, हे या आंदोलनामुळे अधोरेखित झाले आहे. भारतात राहून भारताशी शत्रुत्त्व ठेवणाऱ्यांना चीनचा नेहमी पाठिंबा असतो. आंदोलकांनाही त्यांचाच पाठिंबा असावा. यापूर्वीही भारतात दहशतवादी घटना घडल्या त्यामागे अप्रत्यक्षपणे चीनचा सहभाग असल्याचे आपल्याला दिसून आले आहे.दिल्लीत बिटिंग दी रिट्रीट आणि इस्त्रायली वकिलातीच्या मधोमध झालेल्या बॉम्बस्फोटामागेदेखील पाकिस्तान आणि चीनचा हात असावा. इस्त्रायलच्या वकिलातीला काही इजा पोहोचली असती तर त्यांना इस्त्रायलनेच धडा शिकवला असता. इतके ते सक्षम आहेत. काश्मीरमध्ये तीन दहशतवादी मारले गेले. त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला. पण प्रसारमाध्यमे त्याच्याकडे तितकेसे लक्ष न देता आंदोलकांच्या देशविरोधी कारवायांना मात्र ब्रेकिंग न्यूज करतात, हे चुकीचे असल्याची खंतदेखील महाजन यांनी व्यक्त केली.
अंतर्गत शत्रूंना चीनचा पाठिंबा – हेमंत महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 2:37 AM