चिंचणीचा पाटलीपुत्र आणि नागरीकरणाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:04 AM2019-02-03T07:04:39+5:302019-02-03T07:05:07+5:30
सातवाहन राजांचा काळ म्हणजे महाराष्ट्रातील पहिले सुवर्णयुग! याच काळात गुणाढ्याने बृहत्कथा लिहिली. ही बृहत्कथा आज उपलब्ध नसली तरी इ. स. १०७० मध्ये सोमदेवाने तिचे ‘कथासरित्सागर’ नावाने केलेले भाषांतर आज उपलब्ध आहे.
- डॉ. सूरज पंडित
सातवाहन राजांचा काळ म्हणजे महाराष्ट्रातील पहिले सुवर्णयुग! याच काळात गुणाढ्याने बृहत्कथा लिहिली. ही बृहत्कथा आज उपलब्ध नसली तरी इ. स. १०७० मध्ये सोमदेवाने तिचे ‘कथासरित्सागर’ नावाने केलेले भाषांतर आज उपलब्ध आहे. या ग्रंथात चिंचणी येथील पाटलीच्या ‘पुत्रका’ची कथा येते. या कथेनुसार हा ‘पुत्रक’ मगधाची प्रसिद्ध राजधानी पाटलीपुत्रचा स्थपती होता. हा ‘पुत्रक’ इसवीसनपूर्व पाचव्या शतकात होऊन गेला असावा, असा काही इतिहासकारांचा दावा आहे.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या डॉ. विश्वास गोगटे, डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. श्रीकांत प्रधान आणि डॉ. सचिन जोशी यांनी चिंचणी-डहाणू परिसराचे पुरातत्त्वीय गवेषण करून पालघरजवळील चिंचणी येथे उत्खनन केले. याशिवाय त्यांना चंडीगाव, तानाशी इ. गावांत पुरातत्त्वीय अवशेष सापडले. परंतु चिंचणीचा इतिहास इसवीसनपूर्व पाचव्या शतकापर्यंत मागे नेण्यासाठी कोणताच पुरातत्त्वीय आधार मिळाला नाही. ही एक गोष्ट अधोरेखित होत असली तरी एकूणच चिंचणी येथील मानवी वसाहतीची सुरुवात सातवाहन काळापर्यंत निश्चितच मागे नेता आली.
मुंबई परिसरात तेवीसशे वर्षांपूर्वीच्या नागरीकरणाचे पहिले पुरावे मिळतात ते ‘शूर्पारक’ या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाच्या बंदराचे आणि प्राचीन व्यापारी बाजारपेठेचे. प्राचीन शूर्पारक म्हणजे आजचे सोपारा.
भगवानलाल इंद्रजींनी केलेल्या मुंबई परिसरातील पुरातत्त्वीय गवेषणांनी या परिसराचा सांस्कृतिक इतिहास किमान मौर्यकाळापर्यंत मागे नेला. त्यांना सोपारा येथे सम्राट अशोकाच्या २ राजाज्ञांचे भग्नावशेष मिळाले. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली असावी असे काही इतिहासकारांचे मत आहे.
सम्राट अशोकाने बोलावलेल्या बौद्ध धर्मसंगितीनंतर या प्रदेशात ‘यवन धम्मरख्खित’ या भिक्षूला धर्मप्रसारार्थ पाठवल्याचा उल्लेख श्रीलंकेतील ‘महावंस’ या ग्रंथात येतो. हा भिक्षू ‘यवन’ होता हे त्याच्या नावावरून लक्षात येते. कदाचित काही यवनाच्या वसाहतीही सोपाऱ्याच्या परिसरात असाव्यात.
सोपाºयाच्या सुरुवातीच्या मानव वसाहती दक्षिण गुजरातमधून स्थलांतरितांच्या असाव्यात. प्राचीन सोपारा बंदराचे अवशेष आपल्याला आजही सापडलेले नसले तरी या बंदराचे वर्णन अनेक कथांतून येते. रामायण आणि महाभारतातही सोपारा बंदराचे उल्लेख येतात. परंतु हे उल्लेख प्रक्षिप्त असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. अजिंठा लेण्यातील पूर्णाच्या कथेच्या चित्रात या बंदराचे चित्रण आढळते. त्याची यथातथ्यता पडताळून पाहणे क्रमप्राप्त आहे. सोपाºयाला आज सापडणाºया मोजक्याच सातवाहनपूर्व पुरावशेषांवरूनही येथील मानवी वसाहतीची कल्पना करता येते. या वसाहतीच्या रक्षक यक्षाचे शिल्प दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले आहे. मौर्यकाळात सोपारा येथे बौद्ध भिक्षुसंघाची स्थापना झाली असावी आणि नंतर तो भरभराटीला आला. या भिक्षुसंघाला भगवान बुद्धांनी भेट दिल्याची कथा आहे. याविषयी आपण पुढील लेखात चर्चा करू.
(लेखक पुरातत्त्व वास्तूंचे अभ्यासक आहेत.)