Video : चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:54 PM2019-08-11T16:54:41+5:302019-08-11T16:58:43+5:30
या दानपेट्यांत जमा होणारी रक्कम देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार
मुंबई - चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणीचा दिमाखदार आगमन सोहळा आज रविवारी दुपारी २ वाजल्यापासून लालबाग येथील गणेश टॉकीजकडून सुरु झाला आहे. मात्र, या मंडळाने सामाजिक कार्याचा वसा जपत या मंडळाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर बेघर झालेल्या पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपये देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर या मंडळाने अनोखा उपक्रम राबवत आज आगमनाच्या सोहळ्यादरम्यान मिरवणुकीत ४ दानपेट्या ठेवलेल्या आहेत आणि येणाऱ्या भाविकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. या दानपेट्यांत जमा होणारी रक्कम देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी संदीप परब यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
यंदा या मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष असून महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रावर जे अस्मानी संकट ओढवले आहे. त्या पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून मंडळाच्या ५ लाख रुपयांची जाहीर करण्यात आली आहे. तसेच आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पाड्त आहे. या आगमन सोहळ्यात मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ४ दानपेट्या ठेवण्यात आल्या असून हा सर्व निधी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून चिंचपोकळीचा पूल धोकादायक अवस्थेत असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांच्या सुचनेनुसार आज सकाळी ९.३० वाजता चिंचपोकळीच्या चिंतामणीची मुर्ती आर्थर रोड येथील रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेतून मोजक्या कार्यकर्त्यांसह गणेश टॉकीज येथे आणण्यात आली. गणेश टॉकीजपासून ते श्रॉफ बिल्डिंगजवळील सिग्नलकडून सरदार हॉटेलच्या दिशेने ही मिरवणूक रवाना झाली असून सरदार हॉटेलजवळील सिग्नलजवळून लालबागच्या दिशेने मिरवणूक मागे फिरेल आणि मधल्या गल्लीतून बाप्पाच्या मंडपात नेली जाईल असा या मिरवणुकीचा मार्ग असेल अशी माहिती पुढे परब यांनी दिली. आगमन सोहळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता यावेळी पोलिसांच्या मदतीला वेगळ्या ओळखपत्रासह २०० स्वयंसेवकांसह १ हजार सहाय्यक सदस्य यांची फौज आणि मंडळाचे १२५ कार्यकारिणी सदस्य आहेत. आज अंदाजे रात्री ८ ते ८.३० वाजता या मिरवणुकीची सांगता होऊन चिंतामणी मंडपात पोचेल अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी संदीप परब यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
गणेशलोक संकल्पनेवर चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रभावळ
यंदा शतक महोत्सवीवर्षी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने गणेश लोक या संकल्पनेवर प्रभावळीची रचना केली आहे. प्रभावळीत श्रीगणेशाचा परिवार रेखाटण्यात आला आहे. श्रीगणेशाची पत्नी रिद्धी - सिद्धीसोबत पुत्र शुभ लाभ साकारले आहेत. जसे रिद्धीचा पुत्र शुभ आणि सिद्धीचा पुत्र लाभ हे फक्त अक्षरात पाहिलेले यावर्षी १८ फुटी मुर्तीच्या प्रभावळीवर मुर्तीकार रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. आगमन सोहळ्यात चिंतामणीची वेशभूषा प्रकाश लहाने यांनी केली आहे.