चिंचपोकळी रेल्वे स्थानक : नियोजनाचा ‘पूल’ उभारणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:25 AM2017-10-08T03:25:09+5:302017-10-08T03:25:55+5:30

दक्षिण-मध्य मुंबईतले आणखी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे चिंचपोकळी. विशेष म्हणजे करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानके हुबेहुब एकमेकांसारखी दिसत असल्याने त्यांची ओळख ‘जुळी स्थानके’ अशी आहे.

Chinchpokli railway station: Need to build a 'pool' of planning! | चिंचपोकळी रेल्वे स्थानक : नियोजनाचा ‘पूल’ उभारणे गरजेचे!

चिंचपोकळी रेल्वे स्थानक : नियोजनाचा ‘पूल’ उभारणे गरजेचे!

googlenewsNext

- अक्षय चोरगे ।

मुंबई : दक्षिण-मध्य मुंबईतले आणखी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे चिंचपोकळी. विशेष म्हणजे करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानके हुबेहुब एकमेकांसारखी दिसत असल्याने त्यांची ओळख ‘जुळी स्थानके’ अशी आहे.
अरुंद पूल, पुलावरून बाहेर पडायला अरुंद वाट; स्थानकातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेले चिंचोळ्या जागेतील तिकीट घर, तिकिटासाठी रांगेत उभे असणारे प्रवासी आणि ट्रेन आल्यानंतर येथूनच बाहेर पडण्यासाठी आलेल्या प्रवाशांमुळे होणारी प्रचंड गर्दी... यामुळे स्थानकाबाहेर पडताना प्रवाशांना कसरत करावी लागते. परिणामी, एल्फिन्स्टन दुर्घटनेसारखी दुर्घटना तर घडणार नाही ना, ही भीती प्रवाशांच्या मनात घर करून आहे. अचूक नियोजनाद्वारे पुलाचे रुंदीकरण आणि जिन्याची समस्या सोडवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
चिंचपोकळी रेल्वे स्थानकालगतच्या परिसरातील कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या वाढली असून, गर्दीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. मात्र वाढत्या गर्दीला पुरेशा सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन कमी पडत आहे. येथील जिना अरुंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. स्थानकावर दोन पूल असले तरी चिंचपोकळी फ्लायओव्हरवर जाणाºया पुलाचाच अर्ध्याहून अधिक प्रवासी वापर करतात. अरुंद पूल आणि पुलावरून बाहेर पडायला अरुंद वाट; यामुळे प्रवाशांना कसरत करत रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडावे लागते. सकाळी तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळी ज्येष्ठांना आणि महिलांना जास्त त्रास सहन करावा लागत असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.


पुनर्विकासाच्या
मागणीकडे दुर्लक्ष
२०१२ साली रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे स्थानकाच्या पुनर्विकासाची मागणी करण्यात आली होती. अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. ५ आॅक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकाºयांनी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली; सर्वेक्षणही केले. पण त्यानंतर काहीच झाले नाही. पुन्हा एकदा आम्ही आमच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. प्रवाशांसोबत रेल्वे स्थानकावर काम करणाºया कर्मचाºयांनाही त्रास होत आहे. कार्यालय अतिशय लहान असून, त्यासाठी मोठी जागा नसल्याची बाब मागण्यांमध्ये नमूद केली आहे.
- संजय पासले, स्टेशन मास्तर

प्रतिसाद नाही
दोन वर्षांपूर्वी चिंचपोकळी आणि रे रोड या स्थानकांची पाहणी आणि सर्वेक्षण करून पुनर्विकास आणि डागडुजीची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी पादचारी पुलाची मागणीसुद्धा केली आहे. रेल्वेकडून सातत्याने मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने १२ आॅक्टोबर रोजी रे रोड स्थानकाबाहेर आंदोलन करणार आहोत.
- वारीस पठाण, आमदार

चिंचोळी वाट
चिंचपोकळी स्थानकावर दोन ठिकाणी तिकीटघर आहे. उत्तरेकडील तिकीटघरासमोर प्रवाशांना उभे राहायला खूपच कमी जागा आहे. रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यासाठी असलेली वाटही तिकीटघरासमोरूनच जाते. त्यामुळे जेमतेम पाच ते सहा लोकच रांगेत उभे राहू शकतात. जर त्यापेक्षा जास्त लोक रांगेत उभे राहिले तर तिकीटघरासमोर कोंडी होते. तिकीटघरासमोरील रांगांमुळे स्थानकात ये-जा करण्याºयांना चिंचोळ्या वाटेने स्थानकाबाहेर पडावे लागते. - दिनेश हळदणकर, रेल्वे प्रवासी

दुर्घटनेची भीती
चिंचपोकळी हे लालबागपासून सर्वांत जास्त जवळचे रेल्वे स्थानक असल्याने गणेशोत्सवात स्थानकावर गर्दी वाढते. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्या दर्शनासाठी भाविक येतात. त्यामुळे ११ दिवस स्थानकावर प्रचंड गर्दी असते. परिणामी एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्याची भीती आहे.
- संतोष जाधव, रेल्वे प्रवासी

आश्वासनांवरच बोळवण
चिंचपोकळी रेल्वे स्थानकावरील तिकीटघरांची संख्या वाढवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. अपुरे कर्मचारी असल्याने अजून एक तिकीटघर बांधता येणार नाही, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले. रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वेच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या. परंतु रेल्वेकडून फक्त आश्वासनेच मिळाली.
- सुरेखा लोखंडे, नगरसेविका

गर्दीचा त्रास : उत्तरेकडील पुलावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बाहेर पडायला वाट अतिशय छोटी असल्यामुळे अनेक वेळा धक्काबुक्की होते. महिलांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. - सुनील गोलामडे, प्रवासी

उपाययोजना आवश्यक : एरव्ही फक्त सकाळी व संध्याकाळी गर्दीमुळे प्रवाशांची अडचण होते. मात्र गणेशोत्सवात संपूर्ण दिवसभरच प्रचंड गर्दी होते. चेंगराचेंगरीसुद्धा होते. तिकीट खिडकीसमोरून बाहेर जाताना प्रवाशांची कोंडी होते. रेल्वेने योग्य नियोजनाद्वारे यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. - संदीप ठोंबरे, प्रवासी

तिकीटघरांची संख्या वाढवावी : उत्तरेकडील पुलावर धक्काबुक्की होते. तिकीटघरासमोर जागा नसल्याने रांगेत उभे असलेले प्रवासी आणि ये-जा करणारे प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तिकीटघरांची संख्या वाढवावी. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल. - विशाखा गोते, प्रवासी

Web Title: Chinchpokli railway station: Need to build a 'pool' of planning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.