चायनीज अगरबत्ती आरोग्यास घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:19 AM2017-07-24T05:19:43+5:302017-07-24T05:19:43+5:30
चीनमधून आयात होणाऱ्या विविध घातक कीटकनाशके आणि अनधिकृत रसायनांचा वापर केलेल्या अगरबत्त्या आणि धूप ग्राहकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीनमधून आयात होणाऱ्या विविध घातक कीटकनाशके आणि अनधिकृत रसायनांचा वापर केलेल्या अगरबत्त्या आणि धूप ग्राहकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे, होम इंसेक्ट कंट्रोल असोसिएशनने (एचआयसीए) जाहीर केले आहे. चीनमधून आयात झाल्याने, येथील छोटे व्यापारी आणि रोजगाराचेही नुकसान होत असल्याकडे असोसिएशनने लक्ष वेधले आहे.
चीनी अगरबत्त्या विकून छोटे व्यापारी येथील ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. यामुळे ग्रामीण भागातील हजारो तरुणांचा रोजगारही नष्ट होत असून, कर चुकवेगिरीद्वारे देशाचेही आर्थिक नुकसान होत आहे. घरगुती वापराच्या कीटकनाशकांच्या बाबतीत सर्वसामान्य ग्राहकांना सुशिक्षित व जागरूक करण्याची जबाबदारी असोसिएशनने उचलली आहे. विविध कंपन्यांच्या नावांनी ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर, त्यात सिंट्रोनेला (नैसर्गिक कीटकनाशक) वापरण्यातच आले नसल्याची माहिती परीक्षणात समोर आली आहे.
याउलट फेनोबुकार्ब नावाचे घातक कीटकनाशक यात मिसळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय याचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासाही असोसिएशनने या वेळी केला आहे.
विविध ब्रँडच्या नावाखाली बाजारात सहज विक्री होण्यासाठी या वस्तू पानपट्टीची टपरी किंवा रस्त्यालगतच्या दुकानांत विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. विशेषत: कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत अशा प्रकारच्या अगरबत्त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
...म्हणून चायनीज अगरबत्ती घातक!
चायनीज अगरबत्त्यांमध्ये सिंट्रोनेला अस्तित्वातच नसून, त्यात ‘फेनोबुकार्ब’ हे कार्बामेट कीटकनाशक वापरण्यात आल्याचे बॉम्बे टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन (बीटीआरए) यांच्या प्रयोगशाळेत चाचणी केल्यावर लक्षात आले. फेनोबुकार्ब हे घातक कीटकनाशक भारतासह जगभरातल्या इतर देशांमध्ये निषिद्ध आहे. फेनोबुकार्बयुक्त धूर श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे, डोळ्यांची व त्वचेची जळजळ, अस्वस्थपणा, अति घाम येणे, मध्यवर्ती मज्जासंस्थेची उदासीनता किंवा पोटदुखीसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या रसायनाच्या अतिरिक्त संपर्कामुळे अन्नावरील वासना उडणे, अतिसार, उलट्या, डोकेदुखी, सर्दी, डोळ्यांतून पाणी येणे, श्वासवाहिन्यांमध्ये अडथळा, छातीत घरघर, हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ होणे किंवा ते अचानक कमी होणे, फेफरे येणे आदी आजारही बळावू शकतात.