पालघर : शहरासह संपूर्ण तालुक्यात चायनीज सेंटर आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते स्टॉल बांडगुळाप्रमाणे वाढत असून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयीन मुलांच्या गर्दीचा विळखा या सेंटरभोवती वाढत चालला आहे. हे पदार्थ शरीराला अपायकारक ठरून कॅन्सरला आमंत्रण देत असल्याचे वेळोवेळी आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असले तरी, अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही याकडे कारवाईच्या दृष्टीने डोळेझाक होत आहे. या सर्व बेकायदेशीर स्टॉलवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव केदार काळे यांनी केली आहे.रस्त्यांवर विक्री होणाऱ्या चायनीज व अन्य खाद्यपदार्थांमध्ये ‘इ-कोलाय’ नावाचा बॅक्टेरिया आढळल्याने मुंबईमध्ये शाळा, महाविद्यालयांबाहेर विक्री होत असलेल्या चायनीज भेळ व इतर खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. चायनीज फूडमध्ये अजिनो मोटो (मोनोसोडिअम ग्लुटामेट) च्या वापरामुळे पदार्थांची चव वाढत असली तरी याचा खूप वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर होत असतो. १५ ते २० रुपयांना सहज मिळणारे हे पदार्थ सध्या विद्यार्थ्यांचा आवडता मेनू बनला असून हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळण्यासारखे असल्याने केदार काळे यांनी या सर्व निकृष्ट व आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थविक्री स्टॉलवाल्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)लवकरच कारवाई! - मेमनयासंदर्भात आरोग्य अधिकारी मेमन यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चायनीज नव्हे, कॅन्सरला निमंत्रणच!
By admin | Published: July 11, 2015 11:14 PM