Join us

चिनी मालाला ‘बेस्ट’ पसंती?

By admin | Published: October 27, 2016 4:20 AM

कटकारस्थान करणाऱ्या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देशभर जोर धरत असताना बेस्ट उपक्रमाने आणखी एक चिनी उत्पादन आणण्याची तयारी केली आहे. चिनी बनावटीच्या

मुंबई : कटकारस्थान करणाऱ्या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देशभर जोर धरत असताना बेस्ट उपक्रमाने आणखी एक चिनी उत्पादन आणण्याची तयारी केली आहे. चिनी बनावटीच्या वातानुकूलित बसगाड्या फेल गेल्यानंतरही बेस्टचा चीनच्या मालाचा सोस काही सुटलेला नाही. त्यामुळे या वेळेस इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालणाऱ्या सहा बसगाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र चिनी कंपन्याच यामध्ये पुढे आहेत.मुंबईमधील अरुंद रस्ते, काही ठिकाणी असलेले उंच भाग यावर बेस्ट बस चालवणे कठीण आहे. डिझेलमुळे पर्यावरणावरही परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून बेस्ट पर्यावरणपूरक असलेल्या इलेक्ट्रिक बस घेणार आहे. एका कंपनीकडून चार तर दुसऱ्या कंपनीकडून दोन बस घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेत ए.व्ही. मोटर्स आणि इम्पॅक्ट आॅटोमोटिव्ह सल्युशन्स या दोन कंपन्या पुढे आहेत. मात्र ए.व्ही. मोटर्सने चीनमधील बीव्हीआयडी आॅटो इन्डस्टरी उत्पादित यंत्रणा बसमध्ये पुरवली आहे. ज्यात चीनच्या शेंजेन ग्रेट लँड इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या मोटर्स बॅटरीचा समावेश आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने या बसची खरेदी केली जाणार असल्याचा दावा बेस्टने केला आहे. मात्र चिनी मालामुळे पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेला हरताळ फासला जात असल्याने या बस खरेदीच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाकडूनच विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)- बसची किंमत प्रत्येकी १ कोटी ६३ लाख रुपये आहे. मुंबईमध्ये बेस्ट वीजपुरवठा करत असल्याने चार्जिंग करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसून मुंबईमधील उंच आणि छोट्या रोडवर या बस फायदेशीर ठरणार असल्याचा दावा बेस्टने केला आहे. येत्या बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. - बसला लिथियम बॅटरी असून ३० मिनिटे चार्ज केल्यावर १६० किलोमीटर धावू शकणार आहे. मुंबई महापालिकेने बजेटमध्ये इलेक्ट्रिक बस विकत घेण्यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे. हा निधी बेस्टला ३१ मार्च २०१७ पूर्वी खर्च करावा लागणार असल्याने बेस्टने इलेक्ट्रिक बससाठी टेंडर काढले आहे.