मुंबई: मणिपुरी तरुणीवर अनोळखी इसम थुंकण्याचा प्रकार वाकोला परिसरात घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी कुर्लामधुन अमीर खान (२९) याला अटक केली आहे. जो व्यवसायाने एक सेल्समन आहे. तरुणी चीनी असल्याचा समज झाल्याने हे कृत्य केल्याचे तो पोलिसांना म्हणाला असुन याबाबत चौकशी सुरू आहे.
खान याची ओळख सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे फोटो सर्व पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर देखील पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानुसार तो कुर्लाचा रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले आणि त्याचा गाशा पोलिसांनी गुंडाळला. सांताक्रूझ पूर्वच्या मिलीटरी कॅम्प परिसरात ६ एप्रिल, २०२० रोजी तीस वर्षाची तरुणी धान्य घेण्यासाठी निघाली होती. त्यावेळी मोटरसायकल वरून येणाऱ्या खानने त्याच्या तोंडावरील मास्क वर करत तिच्या दिशेने थुंकत 'तुम्हारी वजह से कोरोना देश मे आया, तुम कोरोना हो' असे म्हणत पळ काढला होता. त्यानंतर तरुणीने याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोरोनाचे संकट डोक्यावर असताना असा प्रकार घडल्याने सांताक्रूझमध्येही तणावाचे वातावरण होते. मात्र ती तरुणी चिनी असल्याचा त्याचा समज झाल्याने त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.