चायनीज तलवारींची चलती
By Admin | Published: October 12, 2014 10:49 PM2014-10-12T22:49:33+5:302014-10-12T22:49:33+5:30
नेत्यांना भेट म्हणून बहुतांश वेळा ‘तलवार’ देण्याची प्रथा रुढ आहे. त्यासाठी प्रचाराच्या इतर साहित्याप्रमाणे चायनामेड तलवारीही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत.
पनवेल : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांकडून मोठमोठ्या सभांमध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख होताना दिसत आहे. प्रचारासाठी अखेरचे काही तास शिल्लक राहिल्याने प्रमुख राजकीय पक्षांकडून राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्यात येत आहे. या नेत्यांना भेट म्हणून बहुतांश वेळा ‘तलवार’ देण्याची प्रथा रुढ आहे. त्यासाठी प्रचाराच्या इतर साहित्याप्रमाणे चायनामेड तलवारीही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत.
निवडणूक काळातील तलवारींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या बाजारात विविध प्रकारच्या तलवारी उपलब्ध असून यात ‘भवानी’ आणि ‘जोधपूरी’ तलवारींना पसंती आहे. या तलवारी प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा तर नांदेडमध्ये बनविल्या जातात. मात्र त्या तुलनेने महाग असल्याने चायनामेड तलवारींना मागणी असल्याचे मुंबईतील विक्रेते अशोक सिंग सांगतात. जेव्हा ग्राहक तलवार अथवा कोणतेही शस्त्र खरेदी करण्यासाठी येतो, त्याची नोंद असणे बंधनकारक आहे. हा नियम राजकीय पक्षांनाही लागू आहे. सध्या पक्षांकडून ३ फूट लांबीची आणि आकर्षक मूठ असलेल्या तलवारींना मोठी मागणी आहे. ही तलवार ५,००० रुपयांपर्यंत उपलब्ध बाजारात आहे. मात्र चिनी बनावटीची याच आकाराची तलवार निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. तलवार भेट देणे ही पूर्वापार परंपरा आहे. त्यामुळे निवडणुकीत तलवार भेटवस्तू म्हणून देण्यास मनाई नाही. मात्र तिची किंमत उमेदवाराच्या खर्चातून होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.