आरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:55 AM2019-09-17T00:55:15+5:302019-09-17T00:55:21+5:30
सर्वसामान्य मुंबईकर आरेत मेट्रो कारशेड उभारण्याला तीव्र विरोध करीत असतानाच मेट्रो कारशेड आरेतच उभारण्याचा राज्य सरकारचा आग्रह आहे.
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकर आरेत मेट्रो कारशेड उभारण्याला तीव्र विरोध करीत असतानाच मेट्रो कारशेड आरेतच उभारण्याचा राज्य सरकारचा आग्रह आहे. मात्र, या विरोधात चिपको चळवळ सुरू करणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमचा मेट्रोला विरोध नाही. पण आरेमध्ये कारशेड उभारण्यास विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईकरांना आरेमध्ये कोणतीही विकासकामे नकोत. मुंबईला पुरापासून वाचविण्यासाठी आरेतील जंगल जैसे थे ठेवावे. आरेशिवाय इतर ठिकाणी मेट्रो उभीकरणे अशक्य असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले आहे. त्यांना जर इतर ठिकाणी कारशेड उभारणे अशक्य वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे मेनन म्हणाल्या.
आरेबाबत शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे. उद्धव ठाकरे
यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत मेट्रोभवनचे उद्घाटन केले. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने १३ सप्टेंबर रोजी मेट्रोशेड बनविण्यासाठी झाडे तोडण्याची परवानगी दिली. मात्र १५ सप्टेंबर रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आम्ही एकही झाड तोडू देणार नसल्याचे सांगितले. हा महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.