Join us

चिपळूण-कराड रेल्वेमार्ग २०१८मध्ये पूर्ण होणार

By admin | Published: October 27, 2015 11:28 PM

कोकण रेल्वे : कोकणातील बंदरांची नाळ पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

रत्नागिरी : कोकण रेल्वेने आपल्या रजत वर्षात प्रगतीचा मोठा टप्पा गाठण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्याअंतर्गत चिपळूण - कराड रेल्वेमार्ग उभारला जाणार असून, २०१८ला हा प्रकल्प पूर्ण होऊन चिपळूण - कराड मार्ग वाहतूकीला खुला होणार असल्याचे याबाबत तयार करण्यात आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. कोकणातील सर्वच सागरी बंदरे पश्चिम महाराष्ट्राला जोडली जाणार असून, त्यातीलच चिपळूण - कराड हा १०३ किलोमीटर्स लांबीचा रेल्वे मार्ग प्रथम उभारला जाणार आहे. याबाबत कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच या मार्गाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. चिपळूण-कराड रेल्वेमार्गामुळे कोकणातील सागरी बंदरे उर्वरित महाराष्ट्राशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला बळ मिळणार असून, शेकडो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. कोकणातील रेवस, दीघी, जयगड, आंग्रे, विजयदुर्ग, रेडी या सागरी बंदरांमधून जहाजांद्वारे येणाऱ्या मालाची वाहतूक राज्यभरात करणे या नव्या रेल्वेमार्गामुळे सुलभ होणार आहे. कोकणच्या विकासाबरोबरच हा रेल्वेमार्ग पश्चिम महाराष्ट्राच्या विकासातही मैलाचा दगड ठरणार आहे. मार्ग उभारणीच्या काळात प्रत्येक वर्षी ५ हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. चिपळूण - कराड या नव्या रेल्वेमार्गाचा थेट प्रभाव लातूर, सोलापूर, परळी, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर होणार आहे. कोल्हापूरमधील साखर कारखान्यांना या मार्गाचा सर्वाधिक लाभ होणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग कोकणसाठी एक प्रगतीचे पुढचे पाऊल ठरणार आहे. (प्रतिनिधी)कोळसा, खते, खनिज वाहतूूक होणार२०१८पासून हा रेल्वेमार्ग वाहतुकीस खुला होणे अपेक्षित असून, त्यावर्षीपासून ११ मेट्रीक टन कोळसा वाहतूक या मार्गावरून होणे अपेक्षित आहे. खत वाहतूक, लोह खनिज व कंटेनर वाहतुकीसाठीही योजना तयार करण्यात आली आहे. २०१८मध्ये १४.०९ मेट्रीक टन मालवाहतूक अपेक्षित असून, २०२३मध्ये ही मालवाहतूक ४३.२ मेट्रीक टन (एम.टी.पी.ए.) अपेक्षीत धरण्यात आली आहे.