चिपी विमानतळ देणार कोकणच्या विकासाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:57+5:302021-09-13T04:04:57+5:30
मुंबई : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते व्हावे? कोणी उपस्थित राहावे? यावरून ...
मुंबई : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते व्हावे? कोणी उपस्थित राहावे? यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. मात्र, राजकारणापलीकडे विचार केल्यास हे विमानतळ कोकणच्या विकासाला गती देणारे ठरणार आहे. ते अशासाठी की पर्यटन वृद्धीसह आंबा, काजू आणि मत्स्योत्पादनाला थेट जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. या बहुचर्चित विमानतळाच्या वैशिष्ट्यांवर टाकलेला दृष्टीक्षेप.
आकारमान
- २७५ हेक्टर व्याप्ती
- २५०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद धावपट्टी
- एअरबस ए-३२० आणि बोईंग ७७७ प्रकारातील विमाने उतरू शकतात
- १० हजार चौरस फुट टर्मिनल बिल्डिंग
- एकावेळी २०० प्रवाशांचे आगमन आणि २०० प्रवाशांचे निर्गमन हाताळण्याची क्षमता
- तीन विमाने पार्क करण्याची सोय. दुसऱ्या टप्प्यात ती १५ पर्यंत वाढविली जाणार.
- नाईट लँडिंग आणि इंधन भरण्यासाठी व्यवस्था
बांधकाम कोणी केले?
'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (९५ वर्षे) या तत्त्वावर सिंधुदुर्ग विमानतळाच्या उभारणीसाठी एमआयडीसीने २००९ साली निविदा काढली. आय.आर.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट कंपनीने ती जिंकली. २०१२ साली पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर चिपी विमानतळाचे काम पूर्ण करण्यात आले. कोरोनामुळे उद्घाटन रखडले. मार्च २०२१ मध्ये डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीबाबत आक्षेप घेतल्याने आणखी विलंब झाला. धावपट्टीची दुरुस्ती केल्यानंतर आता चिपी विमानतळ विमान प्रचलनासाठी सज्ज झाले.
उद्दिष्टे काय?
- हवाईमार्गे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करणे.
- आंबा, काजू आणि मत्स्योत्पादनाला थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणे.
- चिपी परिसरात कार्गो हब तयार करणे, जेणेकरून शेतमाल थेट देशविदेशात पाठवणे शक्य होईल.
- आंब्यासारख्या उत्पादनाचा ताजेपणा आणि चव राखणे होईल.
- देशाच्या कानाकोपऱ्यात ताजे मासे पोहोचवणे
- प्रवासी विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर खासगी आस्थापनांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे.
- रोजगार वाढीस प्रोत्साहन देणे.
विमानसेवा कधी सुरू होणार?
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत येत्या ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल. त्यांनतर अलायन्स एअर ही कंपनी मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर नियोजित फेऱ्या सुरू करेल. दिल्ली, गुजरात, पुणे, बंगळुरूसह प्रमुख विमानतळावर सेवा सुरू करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.