संतोष आंधळे
मुंबई : गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या प्रवासात हेच सीगल आपले हमसफर किंवा सोबती बनतात. पांढरे शुभ्र सीगल उडताना आणि त्यांच्या निरनिराळ्या हरकती पाहताना आपण हरवून जातो. मात्र, याच प्रवासादरम्यान अनेकांना त्यांना चिप्स, वेफर्स आणि गाठीया देण्याचा मोह आवरत नाही. अनेक जण तर खास त्यांच्यासाठी वेफर्सचे एक पाकीट कायम आपल्याजवळ ठेवतात. मात्र, समजून घ्या, हे चिप्स, वेफर्स किंवा गाठीया पक्ष्यांचे अन्न नाही. असे अन्न आपण त्यांना रोज खायला घालणे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकतो. श्वानांनाही दूध-चपातीचा अतिरेक केला जातो. हेदेखील त्यांच्यासाठी धोकादायक आहे. या प्रकारांमुळे पशुपक्ष्यांची जीवनशैलीच धोक्यात येऊ शकते, अशी भीती पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात प्राणी किंवा पक्षी पाळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. या पशुपक्ष्यांना त्यांचे नैसर्गिक खाद्य आणि औषधे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्राण्यांसाठीची औषधालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांना त्यांचा नेमका आहार मिळावा यासाठी औषधालयांचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र आपल्याकडे सर्रास मानवाचे अन्न या पशुपक्ष्यांना दिले जात असल्याचे चित्र आहे.
बहुतांश भागात कावळ्यांना गाठीया, पोपटाला चपाती, श्वानांना दूध-चपाती तसेच या आणि अशा प्रकारचे मानवी अन्न त्यांना दिले जाते. ते पशुपक्ष्यांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र काही नागरिक प्राणिप्रेमापोटी त्यांना हे अन्न देत असतात. याबाबत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले की, आपल्याकडे पाळीव प्राण्यांना दिवाळीचा फराळही खायला दिला जातो. त्यामुळे असे प्राणी लठ्ठ होतात, त्यांना अपेक्षित असलेली पोषकतत्त्वे त्यांना या अन्नातून मिळत नाहीत. त्यांना विविध व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आयुर्मानावर होत असतो."
टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲक्ट्रेक या संशोधन विभागातील प्राणी कर्करोग काळजी केंद्रातील डॉ. प्रदीप चौधरी यांनी सांगितले की, पशुपक्ष्यांना नैसर्गिकरीत्या त्यांना त्यांचे खाद्य शोधून खाण्याची सवय आहे. नागरिक उलट या अनैसर्गिक हरकती करीत असून त्यांच्या खाद्य खाण्याच्या सवयींवर आघात करीत आहेत. पक्ष्यांना चपाती देण्याच्या घटना नवीन नाहीत, मात्र हे असेच चालू राहिले तर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचाही धोका आहे.
मासे वेचून खाण्याची सीगलची सवय
सीगल या पक्ष्यांना समुद्रातील लहान मासे वेचून खाण्याची सवय आहे. परंतु, त्यांची ही सवयच आता लोप पावत चालली असून चिप्स, वेफर असे तेलकट पदार्थ खाण्याची सवय नागरिकच त्यांना लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या समुद्रातील मासे वेचून खाण्याच्या क्षमतेवरही वाईट परिणाम होत आहे. शिवाय तेलकट पदार्थ हे त्यांचे खाद्य नसल्यामुळे त्यांच्या यकृतावर, पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांतून दिसून आले आहे. हे लक्षात घेता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.
नागरिक प्राण्यांवर प्रेम करतात याचा मला आदर आहे. मात्र त्यांना कोणते खाद्य द्यावे याचा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून नीट सल्ला घेतला पाहिजे, याकडेही खारघर येथील ॲक्ट्रेक या संशोधन विभागातील प्राणी कर्करोग काळजी केंद्रातील डॉ. प्रदीप चौधरी यांनी लक्ष वेधले आहे.
श्वानांना जडतात किडनीचे आजार
अनेकदा आपण या तज्ज्ञांकडून ऐकतो, की दूध-चपातीच्या अतिरेकामुळे श्वानांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांचा आहार ठरलेला आहे. देशात पूरस्थिती निर्माण होते, तेव्हा प्राण्यांसाठी नेत असलेले अन्न वैद्यकीय सल्ल्यानेच घेऊन जातो. त्यांना असे कुठलेही खाद्य देणे चुकीचे आहे. या अशा मानवी अन्नामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असतात. अनेक श्वानांना किडनी आणि यकृताचे आजार जडतात, त्याशिवाय त्यांच्या त्वचेवर परिणाम होतो, असे आनंद शिंदे यांनी सांगितले. शिंदे हे प्राणिमित्र आणि ट्रंक कॉल या संस्थेचे संस्थापक आहेत.