राणीच्या बागेत पहिल्याच दिवशी बच्चे कंपनीचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:45+5:302021-02-16T04:07:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - कोविड काळात मार्च २०२० पासून बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सोमवारपासून ...

The chirping of the baby company on the first day in the queen's garden | राणीच्या बागेत पहिल्याच दिवशी बच्चे कंपनीचा किलबिलाट

राणीच्या बागेत पहिल्याच दिवशी बच्चे कंपनीचा किलबिलाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोविड काळात मार्च २०२० पासून बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सोमवारपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले होताच बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत होता. पहिल्याच दिवशी १,४१९ पर्यटकांनी राणीच्या बागेत हजेरी लावली. पेंग्विनसह शक्ती आणि करिश्मा ही वाघाची जोडी विशेष आकर्षण ठरली.

मुंबईत गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर १५ मार्च २०२० पासून राणी बागेचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. मात्र, आता कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात असल्याने काही अटी लागू करीत सोमवारपासून राणीबाग सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. दररोज राणी बागेत पाच हजार पर्यटक येत असतात. या तुलनेत पहिल्या दिवशी केवळ एक हजार ४१९ पर्यटक येऊन गेले. त्यातून ६९ हजार ६०० रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला.

पेंग्विनचे आगमन झाल्यापासून गेल्या दोन-तीन वर्षांत पेंग्विन कक्ष पर्यटकांची पहिली पसंती ठरली आहे. मात्र, यावेळेस वाघांची जोडी, बिबट्याची मादी पिंटो आणि नर ड्रगन तसेच तरस, कोल्हा आणि शेवटी पेंग्विन कक्षाकडे पर्यटक वळत होते. सोमवार असूनही पर्यटकांनी कुटुंबीयांसह प्राणिसंग्रहालयाला आवर्जून भेट देत फिरण्याचा आनंद घेतला. ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय मोफत पाहिले.

प्रभातफेरी, उद्यान सहलींना परवानगी

उद्यानाच्या आत जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ इन्ट्रन्स प्लाझापर्यंत प्रभातफेरीला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी दीडशे रुपयांचा पास दिला जातो. तसेच उद्यानात असलेल्या शेकडो झाडांची ओळख करून देणाऱ्या उद्यान सहलींनाही परवानगी देण्यात आली आहे.

‘द मुंबई झू’ सोशल मीडिया पेजचे लोकार्पण

या प्राणिसंग्रहालयात होणारे विविध शैक्षणिक कार्यक्रम प्रभावीपणे मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याकरिता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज (फेसबुक, युट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्राम) ‘द मुंबई झू’ या नावाने सुरू करण्यात येत आहे. याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: The chirping of the baby company on the first day in the queen's garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.