राणीच्या बागेत पहिल्याच दिवशी बच्चे कंपनीचा किलबिलाट; एक हजार ६२१ पर्यटकांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:42 PM2021-11-01T20:42:18+5:302021-11-01T20:43:05+5:30
तब्बल आठ महिन्यांनंतर राणीची बाग खुली करण्यात आल्याने दिवसभरात एक हजार ६२१ पर्यटकांनी येथे हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - दिवाळीची सुट्टी आणि कोविड काळात घरात कैद बच्चे कंपनीने सोमवारी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात हजेरी लावून आपला आनंद द्विगुणित केला. तब्बल आठ महिन्यांनंतर राणीची बाग खुली करण्यात आल्याने दिवसभरात एक हजार ६२१ पर्यटकांनी येथे हजेरी लावली. यावेळी वाघाची जोडी, पेंग्विनचे दर्शन हे मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरले.
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर १५ मार्च २०२० पासून राणी बागेचे द्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. पहिली लाट ओसरल्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्राणिसंग्रहालय पुन्हा सुरु करण्यात आले. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार झपाट्याने वाढल्याने काही दिवसांतच राणीबाग बंद करण्यात आली. या लाटेचा जोरही आता ओसरला असून कोविडचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे काही कोविड प्रतिबंधक नियमांखाली राणीबाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी एक हजार ६२१ पर्यटकांनी हजेरी लावली. या आकडेवारीत ज्येष्ठ नागरिक आणि तीन वर्षांखालील बालकांचा समावेश नाही.
राणी बागेत पेंग्विनचे आगमन झाल्यापासून मागील दोन - तीन वर्षात पेंग्विन कक्ष पर्यटकांची पहिली पसंती ठरली आहे. पाण्यात सूर मारणारे पेंग्विन पाहणे ही बच्चे कंपनीसाठी एक पर्वणीच ठरत आहे. मात्र यावेळेस वाघांची जोडी, तरस, कोल्हा या प्राण्यांच्या कक्षाकडेही पर्यटकांनी हजेरी लावली होती. मात्र पेंग्विन कक्षाकडे पर्यटक आवर्जून वळत होते. सोमवार असूनही पर्यटकांनी कुटुंबियांसह प्राणिसंग्रहालयाला आवर्जून भेट देत फिरण्याचा आनंद घेतला. पर्यटकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या माध्यमातून दिवसभरात पालिकेच्या तिजोरीत ६८ हजार ७२५ रुपये उत्पन्न जमा झाले आहे.