Join us  

चिंतन उपाध्यायचा झाला ‘गजनी’?

By admin | Published: January 06, 2016 2:09 AM

हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भांबानी यांच्या खून प्रकरणातील एक प्रमुख आरोपी हेमाचा पती चिंतन उपाध्याय आता ‘गजनी’च्या भूमिकेत गेला आहे

डिप्पी वांकाणी ,  मुंबई हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भांबानी यांच्या खून प्रकरणातील एक प्रमुख आरोपी हेमाचा पती चिंतन उपाध्याय आता ‘गजनी’च्या भूमिकेत गेला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काहीही आठवत नसल्याचे चिंतन सांगत आहे. दोन दिवसांपूर्वीच चिंतनची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चिंतनने एक कट आखला होता. यानुसार चिंतनने विद्याधर राजभरला असे सांगितले होते की, तू तुझ्या नोकराला माझ्या जयपूर येथील निवासस्थानी पाठव. माझे घर आणि शहराची माहिती यानिमित्ताने त्याला कळेल. याचा उपयोग नंतर चिंतन वेगळया प्रकारे करणार होता. या नोकराने नंतर हेमाजवळ हे सांगायचे की, मी चिंतनच्या जयपूर येथील निवासस्थानी काम केलेले आहे. मला चिंतनची एक अशी क्लिप सापडलेली आहे ज्यात चिंतन इतर महिलांसोबत दिसत आहे. चिंतन व इतर चार जणांना पोलिसांनी या दुहेरी खून खटल्यात अटक केलेली आहे. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी विद्याधर अद्याप फरार आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चिंतन बऱ्याचदा महत्वाची माहिती सांगण्यापर्यंत येउन ठेपतो पण, नंतर मला काहीच आठवत नाही, असे सांगतो. आपल्याला स्मृतीभ्रंशाचा आजार असल्याचेही तो सांगत आहे, पण हे सर्व आम्हाला चकवा देण्यासाठीच आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. चिंतनचे वडील विद्यासागर यांनी सांगितले की, विद्याधर हा जयपूरमधील त्यांच्या निवासस्थानी ५ डिसेंबरला काही मित्रांसोबत आला होता. येथे येण्याचे कारण त्याला विचारले असता विद्याधरने सांगितले होते की, कोटा येथे काही कामानिमित्त आपण आलेलो आहोत तर त्याच्या क्षेत्रातील कलाकारांसाठी नवे काम शोधण्यासाठी आपण आल्याचेही तो सांगत होता. हेमाचे मन वळविण्यासाठी चिंतनने एका नोकराला हाताशी धरुन एक कट करण्याचे ठरविले होते खरे. पण, हा कट प्रत्यक्षात येणार नाही याची खात्री चिंतनला होती. कारण हा नोकर जेंव्हा हेमाकडे माझ्याबद्दल वा कथित क्लिपबद्दल माहिती देईल तेंव्हा हेमा इतक्या सहज त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. उलट या नोकरालाच अनेक प्रश्न विचारेल ज्याची उत्तरे या नोकराला देता येणार नाहीत आणि आपला कट उघडकीस येईल, याची धास्तीही चिंतनला होती. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्याधरने दक्षिण भारतातून एकदा लँड लाईनवरुन संपर्कासाठी फोन केला होता. पण, त्यानंतर त्याने पुन्हा फोन केला नाही. विद्याधरचे शेवटचे लोकेशन आम्हाला दक्षिण भारतात मिळाले होते. तथापि, हे लोकेशनही नेमके ठिकाण दर्शविणारे नव्हते. आमची पथके विद्याधरला तीन राज्यात शोधत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.