Join us

शितपच्या जामिनाला नातेवाइकांचा विरोध, उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 3:03 AM

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी स्थानिक नेता सुनील शितप याच्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पीडितांच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी स्थानिक नेता सुनील शितप याच्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पीडितांच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.घाटकोपरच्या सिद्धिसाई इमारतीत सुनील शितप याचे चार फ्लॅट्स होते. या फ्लॅट्सचा वापर व्यावसायिक बाबींसाठी करण्याकरिता त्याने नियम धाब्यावर बसवून फ्लॅट्स दुरुस्ती केली. या दुरुस्तीमुळे इमारत कोसळली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी शितप याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली.शितप याने जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र २४ आॅगस्ट रोजी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. त्यामुळे शितप याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी आहे.दरम्यान, पीडितांच्या नातेवाईकांनी शितप याच्या जामीन अर्जात मध्यस्थी करण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जानुसार, शितप याने अनेक बाबी न्यायालयापासून लपवून ठेवल्या आहेत. त्या निदर्शनास आणण्यासाठी मध्यस्थी अर्ज करण्यात आला आहे. तसेच शितप याच्यावर राजकारण्यांची कृपा असल्याने त्याची जामिनावर सुटका केल्यास तो रहिवाशांवर दबाव आणेल. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. शितप याच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी आहे.

टॅग्स :न्यायालय