Join us  

‘चित्रा’ पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत; आता प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समधील कम्फर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 5:54 AM

सिंगल स्क्रीनच्या दरात प्रेक्षकांना मिळणार मल्टिप्लेक्समधील कम्फर्ट

संजय घावरेमुंबई : दिवसेंदिवस मल्टिप्लेक्सचा दबदबा वाढत असताना मुंबईतील तीन सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे पुन्हा रसिकांच्या सेवेत रुजू झाली आहे. चित्रा, अजंठा आणि श्रेयस (राजहंस) या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांनी कात टाकली असून, मल्टिप्लेक्सशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाली आहेत. अक्षय तृतीयेच्या अगोदरच्या दिवशी रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या साक्षीने तीन चित्रपटगृहे सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सर्वांसाठी सोयीचे असणारे दादरमधील मेहता कुटुंबीयांच्या मालकीचे चित्रा चित्रपटगृह १९४५-४६ पासून सिनेप्रेमींचे हक्काचे माहेरघर बनले होते. कोरोनाकाळात बंद झालेले चित्रा इतर सिनेमागृहांसोबत सुरू न झाल्याने सिनेप्रेमींमध्ये नाराजी होती. चित्राचे मालक दारा मेहतांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी चित्रा पुन्हा सुरू केले असून, जुन्याच दरात मल्टिप्लेक्सचा कम्फर्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्रोजेक्टर, एसी प्लांट, रंगकाम, स्क्रीन, आसने, साउंड सिस्टीम बदलण्यात आली आहे. बोरीवलीतील अजंठा चित्रपटगृह मागील सात वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद होते. मल्टिप्लेक्सच्या शर्यतीत आपला टिकाव लागू शकणार नाही यामुळे त्यावेळी माघार घेतलेले अजंठा पुन्हा सुरू झाले आहे. आता या सिनेमागृहात दाखल झाल्यावर मल्टिप्लेक्सचा फील येतो. पूर्वी तळ मजल्यावर असलेले हे सिनेमागृह आता चौथ्या मजल्यावर आहे. आता अजंठा सिने एक्स बनलेल्या या सिनेमागृहात पूर्वी १०१० आसनक्षमता होती आणि आता ३३४ आहे. येथे १२० रुपयांपासून २०० रुपये तिकिटदर आहेत. चित्रा आणि अजंठाखेरीज घाटकोपरमधील श्रेयस सिनेमागृह राजहंस नावाने सुरू झाले आहे. येथे २५० आसनक्षमतेची दोन सिंगल स्क्रिन थिएटर्स आहेत.

बंद चित्रपटगृहेभारतमाता (लालबाग), ईरॅास (चर्चगेट), प्रीमियर (दादर), दीपक (प्रभादेवी), शारदा (दादर), गणेश (ठाणे), वंदना (ठाणे), सेंट्रल प्लाझा (गिरगाव), लिबर्टी (मरीन लाइन्स)

  चित्रा चित्रपटगृहात पूर्वी ५३९ आसने होती, आता ५०६ आहेत. जवळपास दीड कोटी खर्च केले आहेत.  १०० रुपयांपासून पूर्वी सुरू होणारे तिकीटदर आजही तेच आहेत. तेव्हाही बाल्कनी २५० रुपये होती आणि आताही आहे.   चित्रपटगृहाचे नूतनीकरण केले असले तरी तिकीट दर न वाढविता जुनेच दर ठेवले आहे.

चित्रा सुरू झाल्याने लालबाग-परळपासून दादर-माटुंग्यामधील स्थानिक आनंदी आहेत. रसिक पहिल्या दिवसांपासून गर्दी करत आहेत. जुन्याच दरात मनोरंजन करण्याचा प्रयत्न आहे. सिनेमागृह बंद असतानाही मेहता कुटुंबीयांनी सर्व खर्च उचलला आहे.- दामोदर भोयर, केअर टेकर, चित्रा जानेवारी २०२० मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू केले. पण कोरोनामुळे काम थांबवावे लागल्याने एक वर्ष लागले. डॉल्बी साउंड सिस्टीम, लेटेस्ट साउंड क्वालिटी, आरामदायक आसने आणि सिल्व्हर स्क्रीन लावले असून, इंटिरिअर आणि इतर गोष्टींसाठी दीड कोटी खर्च केले आहेत.             - विशाल मढवी प्रोग्रॅमर, अजंठा सिने एक्स

 

टॅग्स :मुंबईसिनेमा