Join us  

Chitra Wagh: अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितली पुढची रणिनिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 9:03 PM

या बैठकीनंतर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील रणनिती सांगितली.

मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई दौरा आज पार पडला. काल रात्री मुंबई दाखल झालेल्या अमित शाह यांनी आज शहरातील निवडक गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणरायाच्या दर्शनाने त्यांनी दौऱ्याची सुरूवात केली. त्यानंतर वर्षा येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरातील गणरायाचे आणि सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरातील गणरायाचे अमित शाह यांनी दर्शन घेतले. त्यानंतर, भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील रणनिती सांगितली.

शहा यांच्या मुंबईत दौऱ्यामध्ये त्यांनी मुंबईत भाजपाच्या नेते, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत, 'उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्याला दगा दिला आणि शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला', असे थेट मत व्यक्त केले. त्यानंतर, अमित शाह यांनी मुंबई दौरा संपताच एक सूचक ट्विट केले. तर, चित्रा वाघ यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत शहा यांच्या मार्गदर्शनाबद्दलची माहिती दिली. 

प्रत्येकजण आपला पक्ष वाढवतच असतो, त्यापद्धतीने आमच्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय. त्या, मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईत आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात भाजप चांगलं काम करेल. शहांच्या मार्गदर्शनात आम्ही भरीव काम करू, मुंबईकरांची, महाराष्ट्राची आम्ही सेवा करू, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. 

अमित शहांचं ट्विट

"मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत, जनता NDA सोबत आहे. मला विश्वास आहे की आगामी BMC निवडणुकीत NDA प्रचंड बहुमताने विजयी होईल", असं सूचक ट्विट अमित शाह यांनी केले. 

टॅग्स :चित्रा वाघमुंबईअमित शाहभाजपा