पुणे/मुंबई - भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ आणि फोटो ट्वीट केले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला. तर, सोशल मीडियातूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामना या डिजिटल माध्यमासाठी मुलाखत दिली. विशेष म्हणजे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रा वाघ यांनीही यावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजप आणि बंडखोर आमदारांवर टिका केली. नाव न घेता त्यांनी बंडखोर आमदारांना पालापाचोळा म्हटलं. तर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगला अनुसरुन विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्राचं निसर्ग सौंदर्य या आमदारांना दिसलं नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतर, आता मुलाखतीवर प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी सांगोला स्टाईलने मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय ती घरातल्या घरातली मुलाखत.. कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के, असे म्हणत मुलाखतीची खिल्ली उडवली. तसेच, मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या. पण, तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं, अशा शब्दात मुलाखतीनंतर टिकाही केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वत: कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे. त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास ही फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱ्याखोऱ्या छान फुलांची बहरून जातात. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौदर्यं दिसलं नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो पण हे काय आपल्या मातीसाठी करणार? असा सवाल त्यांनी केला.