मुंबई - भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये (एनजीएमए) 'चित्रकाव्यम् रामायणम' आणि 'शक्ती –फेअर अँड फियर्स' हि दोन चित्र प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. या निमित्ताने दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतींचा अनोखा संगम उदयोन्मुख कलाकारांच्या कलेशी घडवण्यात आला आहे.
८ जून रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन ७ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून मंगळवार ते रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत कलाप्रेमींसाठी खुले आहे. चित्रकाव्यम् रामायणम् या प्रदर्शनातून 'रामायण' या महाकाव्याच्या कलात्मक अवलोकनाची समृद्धी पाहायला मिळते. अनेक संस्था आणि खाजगी संग्राहकांशी समन्वय साधून एनजीएमए हे प्रदर्शन विविध माध्यमांद्वारे सादर करत आहे.
यात चित्रे, टेक्स्टाईल्स, शिल्पे, शॅडो पपेट्स आणि इमर्सिव्ह इंस्टॉलेशन्सचा समावेश आहे. यात नंदलाल बोस, क्षितींद्रनाथ मजुमदार, उपेंद्र महारथी, शक्ती बर्मन, विभोर सोगानी, चारुवी अग्रवाल, नीरज गुप्ता आणि अशा प्रख्यात कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनाच्या एनजीएमए संग्रहामध्ये बंगाल स्कूलच्या कलाकारांच्या चित्रांचा समावेश असून या कलाकारांनी त्यात जपानी तंत्रांसह पारंपरिक संवेदनशीलता एकत्रित केली आहे. यात चित्तोप्रसाद भट्टाचार्य यांच्या 'प्रिंट्स' आणि इंदरकला देवी आणि बच्चो देवीसारख्या कलाकारांच्या 'मधुबनी'सारख्या पारंपरिक चित्रकला देखील आहेत. याशिवाय पप्पू सोनकर यांची सीतेच्या अपहरणावरील हाताने विणलेली टेपेस्ट्री आणि रामायण-थीम असलेल्या फिलाटेलिक वस्तूंवरील एक भाग प्रदर्शनाला अनोखे परिमाण प्राप्त करून देतो.
'शक्ती' ही विविध जागतिक तत्त्वज्ञानांमध्ये उपस्थित असलेली संकल्पना असून, ती दैवी स्त्री तत्त्वाला म्हणजेच सर्व निर्मिती, पालनपोषण आणि परिवर्तनाचा स्रोत अशा तत्वाला मूर्त रूप देते. 'फेअर अँड फियर्स'मधील 'फेअर' हा शब्द त्वचेच्या रंगाच्या बाबतीतील गोरेपणाबद्दल नाही. येथे 'फेअर' हा शब्द न्याय, दयाळूपणा, औदार्य आणि स्त्रियांच्या पालनपोषणाच्या स्वभावाबद्दल आहे.
'फियर्स' या पैलूतून अन्याय आणि हिंसाचाराचा सामना करू शकणारी लवचिकता दाखवली आहे. म्युझियम ऑफ सेक्रेड आर्ट, बेल्जियमच्या सहकार्याने 'शक्ती–फेअर अँड फियर्स' एक शक्तिशाली प्रदर्शन आयोजित केले असून, पुरुषांचे वर्चस्व असलेल्या कलाविश्वात स्त्रियांची ऊर्जा आणि सर्जनशीलता या प्रदर्शनातून साजरी केली आहे. मेघना व्यास अरोरा आणि श्रुती दास यांच्या इनपुट्ससह सुषमा बहल यांनी निर्माण केलेल्या या प्रदर्शनात विविध शैलींमध्ये काम करणाऱ्या भारतातील सुमारे ५५ महिला कलाकारांचा समावेश आहे. या संग्रहामध्ये चित्रे, रेखाचित्रे, प्रिंट्स, शिल्पे, इंस्टॉलेशन्स , अॅनिमेशन, डिजिटल आर्ट, व्हिडिओ आर्ट, पॉप आर्ट आणि भरतकाम इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये उदयोन्मुख कलाकारांसह अपर्णा कौर, वृंदा मिलर, जयश्री बर्मन, माधवी पारेख यांसारख्या प्रमुख कलाकारांच्या कलाकृती आहेत.