मुंबई : हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे लंपास करण्याचा प्रकार वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये घडला. याप्रकरणी एका अकाऊंटंटला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. बीकेसी परिसरात नव्याने उघडलेल्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. यातील तक्रारदार राम शर्मा हे या हॉटेलचे व्यवस्थापक आहेत.गुरुवारी शर्मा यांची सुट्टी होती. मात्र हॉटेल नवीन असल्याने काही कामे बाकी असल्याने ते कामावर आले आणि संध्याकाळी साडेसातला निघून गेले. हॉटेल एक वाजता बंद होत असल्याने रात्री दीडच्या सुमारास मोबाईल अॅपच्या मदतीने त्यांनी रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यात हॉटेलचा कॅशिअर रामआसरे यादव (३६) हा काऊंटरवरील काही रक्कम काढून एका फाईलमध्ये ठेवत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी सोमवारी शर्मा कामावर आले तेव्हा त्यांना गल्ल्यातील ५० हजार रुपये कमी आढळले. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी एका कर्मचाºयाला विचारणा केली. ज्यात यादवने त्याला फक्त सहाशे रुपये दिल्याचे सांगितले. तेव्हा शर्मा यांनी याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने जवळपास ७५ हजार रुपये लंपास केल्याचे उघड झाले. यातील १८०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले असून अधिक चौकशी सुरु आहे.
चोरी करणारा अकाउंटंट अटकेत,बीकेसी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:57 AM