गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'क्लोरल हायड्रेट' या ड्रग केमिकलचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी उघडकीस आली आहे. याठिकाणी असलेल्या एका कारखान्यात धाड टाकत लाखो रुपयांचे ड्रग केमिकल हस्तगत करण्यात खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक आणि आरे पोलिसांच्या पथकाला यश मिळाले आहे. याप्रकरणी कारखाना मालकाला त्यांनी अटक केल्याचे समजते.
आरे पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या युनिट १ आणि ३१ मध्ये खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी मुंबईतील २५० तडीच्या दुकानांना क्लोरल हायड्रेट या विषारी ड्रग केमिकलचा पुरवठा करणाऱ्या व्यंकटा करबुय्याला (४६) त्याच्या अन्य दोन साथीदारांसह अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून ४५ लाख ३४ हजार ३०० रुपयांचे केमिकलही हस्तगत करण्यात आले होते. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणारे हे ड्रग केमिकल त्यांनी कुठून आणले याबाबत चौकशी सुरू होती.
सुरुवातीला ताकास तूर लागू न देणाऱ्या संशयित आरोपींच्या कसून चौकशीत या रसायनची लिंक नाशिकमध्ये असल्याचे नायक यांना समजले. त्यानुसार ते आरे पोलिसांसह नाशिकला रवाना झाले. त्यांनी नाशिकच्या दिंडोरी परिसरात एका मोठया करखान्यावर धाड टाकली. या धाडीत कारखान्यातुन मोठ्या प्रमाणात हे ड्रग केमिकल त्यांना सापडल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याची किंमतही लाखो रुपयांच्या घरात असल्याचे समजते. कारखाना मालकाला देखील नायक आणि आरे पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. हा कारखाना उद्धवस्त करणे हे मुंबई पोलिसांचे फार मोठे यश मानले जात आहे. याठिकाणी ताब्यात घेण्यात आलेल्या कारखाना मालकाला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.