नोकरीची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:09+5:302021-07-29T04:07:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या प्रकोपातून लग्नाळू मंडळीही सुटलेली नाहीत. कारण या काळात नोकरीची गॅरंटी नसल्याने त्यांना छोकरीची ...

Choice of 'girl' postponed due to lack of job guarantee | नोकरीची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

नोकरीची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या प्रकोपातून लग्नाळू मंडळीही सुटलेली नाहीत. कारण या काळात नोकरीची गॅरंटी नसल्याने त्यांना छोकरीची निवड लांबणीवर टाकावी लागली आहे.

युवकांचा देश असलेल्या भारतात लग्नेच्छुकांची संख्या सर्वाधिक. पण कोरोनाने त्यांच्या प्रयत्नांत आडकाठी आणली आहे. लॉकडाऊनच्या तडाख्यामुळे मोठमोठ्या कंपन्या तोट्यात गेल्याने येत्या काळात नवे रोजगार निर्माण होण्याची आशा धूसर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आहे ती नोकरी टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशात दोनाचे चार हात केले आणि काही दिवसांनी नोकरीच गमवावी तर जोडीदाराचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेत अनेक जण आहेत. त्यामुळे बऱ्याच लग्नेच्छुकांनी स्थळ बघण्याचे कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुढच्या नियोजनावर त्यांचा भर आहे.

छोकऱ्यांनीही या काळात लग्नाची घाई न करण्याचे ठरवल्याचे दिसून येते. भावी जोडीदाराच्या नोकरीचा भरवसा नसल्याने भविष्यकालीन चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे त्यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे.

......

कठीण काळात दोनाचे चार हात करणार कसे?

सध्या नोकरी टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात संसाराची कसरत करण्याची हिम्मत होत नाही. कोरोना हद्दपार झाल्यानंतरच दोनाचे चार हात करण्याचा विचार करू.

- प्रल्हाद दळवी, चांदिवली

....

पहिल्या लॉकडाऊनमध्ये सहा महिने काम बंद होते. पगार मिळत नसल्याने आर्थिक चणचण सहन करावी लागली. दुसऱ्या लाटेत कसेबसे तरलो. आता तिसरी लाट आली आणि सगळे साफ करून घेऊन गेली तर करायचे काय, या भीतीपोटी लग्नाचा विचार पुढे ढकलला आहे.

- संतोष नाईक, मालाड

.....

ज्याचं जुळलं त्यांना वेगळीच चिंता

ज्यांचे लग्न जुळले आहे त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. राज्य शासनाने लग्नसोहळ्यातील उपस्थितांच्या संख्येवरचे निर्बंध अद्याप पूर्णतः शिथिल न केल्याने पाहुण्यांचे मानपान करताना नाकीनऊ येत आहेत. कोणाला बोलवावे आणि कोणाला घरातूनच आशीर्वाद देण्यास सांगावेत, हा पेच त्यांच्यासमोर आहे. जवळचा व्यक्ती दुखावला जाऊ नये, याची काळजी घेऊन नियोजन करावे लागत आहे.

.....

कोरोना काळात किती विवाह झाले?

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ - ३,३६७

एप्रिल २०२१ - २५१

Web Title: Choice of 'girl' postponed due to lack of job guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.