Join us

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चिमुरड्याला चटके

By admin | Published: July 18, 2015 3:57 AM

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने २८ वर्षीय प्रियकराने त्याच्या विवाहित प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाला सिगारेटचे चटके दिल्याची घटना विक्रोळीत घडली.

मुंबई : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने २८ वर्षीय प्रियकराने त्याच्या विवाहित प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाला सिगारेटचे चटके दिल्याची घटना विक्रोळीत घडली. शेजाऱ्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस येताच विक्रोळी पोलिसांनी सतीश कोटीयन या आरोपी प्रियकरास अटक केली आहे. त्यापाठोपाठ चिमुरड्याच्या आईलाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मूळची सातारा येथील रहिवासी असलेली २४ वर्षीय विवाहिता गेल्या महिनाभरापासून ४ वर्षांच्या मुलासोबत विक्रोळी टागोर नगर परिसरात राहत आहे. पतीला सोडून मुंबईत आल्यानंतर ती कोटीयनसोबत विक्रोळीत राहते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या प्रेमसंबंधात मुलगा अडसर होत असल्याने कोटीयन मुलाला बेदम मारहाण करीत होता. यामध्ये मुलाचा पायही फ्रॅक्चर झाला आहे. मुलाला भीती घालण्यासाठी हा नराधम या चिमुकल्याला सिगारेटचे चटके देत होता. मंगळवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात मुलाला मारहाण झाल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी मुलाकडे विचारणा केली असता झालेला प्रकार उघड झाला. अखेर शेजारच्यांनीच पुढाकार घेत याची माहिती विक्रोळी पोलिसांना दिली. मुलाच्या वैद्यकीय तपासणीत त्याला मारहाण आणि सिगारेटचे चटके दिल्याचे समोर आले. मुलाला विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चिमुरड्यावर होत असलेला अत्याचार आईनेही दुर्लक्षित केला, याबाबत अधिक तपास सुरू आहे. यात चिमुरड्याच्या आईलाही अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)