मुंबई : राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास यंदा मोबाइल अॅपला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे पालकांना घरबसल्या मोबाइलवरून आपल्या पाल्यासाठी सोयीची शाळा निवडता येणार आहे. शिवाय शाळा नोंदणीची प्रक्रिया यंदा फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे.त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे. मागील शैक्षणिक वर्षातही मोबाइल अॅपच्या माध्यमातून काही प्रवेश करण्यात आले होते. मात्र, त्यात उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. अर्जामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचा क्रमांक नमूद करण्याचा पर्यायच दिसत नाही. एससी प्रवर्गाचादेखील पर्याय दिसत नाही. तसेच अर्ज भरल्यानंतर तो सबमिट होत नसल्याची तक्रार पालकांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी केली होती. शिवाय पालकांनाअॅपबद्दल अपुरी माहिती होती. त्यामुळे गेल्या वर्षी केवळ ७५ पालकांनी या माध्यमातून अर्ज भरले होते. यंदा मात्र प्रवेशासाठी मोबाइल अॅपच्या वापराबाबत शालेय शिक्षण विभाग आग्रही आहे.हे आरटीई मोबाइल अॅप गुगल प्लेवरून डाउनलोड करता येणार असल्याने पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज घरातून भरता येणार असून, जवळच्या शाळांचे लोकेशन मॅप होणार आहे.>लोकेशन समजणार; शाळांचे होणार मॅपींगआरटीई प्रवेशात पहिल्या टप्प्यात १ किलोमीटर, त्यानंतर ३ किलोमीटरवरील शाळा असे स्वरूप आहे. त्यामुळे अॅपवर शाळांची निवड करतानाही अनेकदा पालकांचा गोंधळ उडाला. घरापासून जवळ असलेली शाळा निवडतानाही शालेय शिक्षण विभागाला अपयश आले. यंदा मात्र पालकांनी अर्ज मोबाइलमधून आणि आपल्या घरातून भरल्यास त्यांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून घराचे लोकेशन आणि घरापासून असलेल्या जवळच्या शाळांचे मॅपिंग होणार आहे. त्यामुळे पालकांनी आरटीई अॅपचा वापर करूनच प्रवेश नोंदणी करावी. शिवाय यंदा प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
आरटीई अॅपवरून निवडा शाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:54 AM