आजपासून निवडा आपल्या आवडीचे कॉलेज, भरा ऑनलाइन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 09:58 AM2023-05-27T09:58:36+5:302023-05-27T09:58:52+5:30
१२ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नावनोंदणी बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया २७ मे २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांना सोमवार, १२ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नावनोंदणी करणे बंधनकारक असेल. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित व स्वायत्त महाविद्यालयांना प्रवेशप्रक्रियेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि मंजूर केलेल्या जागांनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असेल. यासोबतच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी बहुसंख्य महाविद्यालये आणि विविध अभ्यासक्रमांसाठी करता येणार असून, अभ्यासक्रमनिहाय नोंदणी अर्जाची प्रत संबंधित महाविद्यालयांमध्ये पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी लागणार आहे.
..असा भरता येईल अर्ज
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम https://mumoa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व नोंदणी करावी.
विद्यार्थ्यांनी अजून माहिती भरल्यानंतर त्यांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर यूझर आय़डी आणि पासवर्ड पाठविला जाईल.
यूझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून वैयक्तिक, शैक्षणिक आदी संबंधित माहिती भरावी लागेल. तसेच स्कॅन केलेले छायाचित्र अपलोड करावे लागेल.
कन्फर्म प्रोफाइल या पर्यायावर क्लिक करून माहिती तपासून घेता येईल.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेत नमूद केलेले अभ्यासक्रम व महाविद्यालये निवडावी लागतील.
ऑनलाइन नोंदणीचे असे असेल वेळापत्रक
अर्जविक्री आणि प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी तसेच अर्ज सादर करण्याचा कालावधी २७ मे ते १२ जून दुपारी दुपारी १ वाजेपर्यंत
महाविद्यालयांतर्गत आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत होणारी प्रवेशप्रक्रिया याच कालावधीत होईल.
१९ जून, सकाळी ११ वाजता,
प्रथम गुणवत्ता यादी
२० जून ते २७ जून दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क भरता येईल.
२८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता, दुसरी गुणवत्ता यादी
३० जून ते ५ जुलै दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन कागदपत्र तपासणी व शुल्क भरणा
६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, तिसरी गुणवत्ता यादी
७ जुलै ते १० जुलै दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन कागदपत्र तपासणी व शुल्क भरणा