मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) आणि भाजपा यांच्यात खडाजंगी सुरु आहे. भाजपा तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. त्याचसोबत राज्यातील भाजपा नेत्यांना शिवसेना हा दादाच आहे अशा शब्दात इशारा दिला. त्यावर भाजपा नेत्यांनीही संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजपाचे मोहित कंबोज यांनी राऊतांवर टीका केली, ते म्हणाले की, सलीम जावेद जोडीतील संजय राऊतांना माझा सवाल आहे. ४० वर्ष आपण शिवसेनेत आहात परंतु आजवर कोणती निवडणूक तुम्ही लढलात? देशभरात सगळीकडे शिवसेना आणि तिचा उमेदवार जिथे जिथे तुम्ही गेलात तिथे तुमचे डिपॅाजिट जप्त झाले आहे. त्यामुळे गोवा, युपीच राहु द्या, महापालिकेतला सर्वात ताकदीचा सेफ वॅार्ड निवडा आणि फक्त एकदा नगरसेवक होऊन दाखवा. बाकीच्या सर्व गप्पा राहू द्या असं खुलं आव्हान त्यांनी राऊतांना दिले आहे.
राऊत म्हणाले मुंबईचा 'दादा' शिवसेनाच
केंद्रातील मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र या सर्वांची मी पोलखोल करणार आहे. "मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची ताकद पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतोय. त्यांना माहिती आहेच मला काय सांगायचे आहे. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाणंही मुश्कील होईल", असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं चोख प्रत्युत्तर
"संजय राऊत हे सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधानं केली पाहिजेत हे त्यांना चांगलं माहित आहे. त्यांना जे काही मांडायचं असेल ते त्यांना कोर्टात मांडावं" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच संजय राऊत नेहमीच त्यांच्याकडे फोकस कसा राहील यासाठी अशी विधानं करत असतात असा टोला फडणवीसांनी लगावला.