Join us

सायबर सिटीत ख्रिसमसचा जल्लोष

By admin | Published: December 26, 2016 6:28 AM

सायबर सिटीत ख्रिसमसचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. या उत्सवानिमित्त शहरातील हॉटेल्स, चर्च, मॉल्समधून आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

नवी मुंबई : सायबर सिटीत ख्रिसमसचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. या उत्सवानिमित्त शहरातील हॉटेल्स, चर्च, मॉल्समधून आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. ख्रिस्ती बांधवांनी विविध ठिकाणच्या चर्चमध्ये जावून सहकुटुंब प्रार्थना केली, तसेच एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून शहरातील सर्वच चर्चमध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्र म राबवले गेले. गवत, माती, पुतळे आणि चित्रांच्या सहाय्याने येशू जन्माचे प्रसंग देखाव्यातून साकारण्यात आले आहेत. शनिवारी रात्री दहानंतर प्रभू येशूची भक्तीपर गाणी गाऊन, उपासना करण्यात आली. शहरातील काही चर्चमध्ये रात्री प्रभू येशूच्या जन्मकाळाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना शुभेच्छा देत बच्चेकंपनीला भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. रविवारी सकाळी चर्चमध्ये ख्रिस्ताची पवित्र वचनं सांगत त्याची विशेष उपासना करण्यात आली. घंटानाद, केक, भेटवस्तू तसेच गाणी आणि नृत्यांनी सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्व चर्चेस ख्रिसमसनिमित्त विशेष ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची मनमोहक सजावट पाहायला मिळत आहे. वाशीतील मॉल्समध्ये लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, जादूचे प्रयोग तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे केक खरेदी करण्यासाठी शहरातील बेकरींमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. शहरातील हॉटेल्समध्ये शनिवारपासून मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत असून ग्राहकांकरिता नाताळनिमित्त विशेष भेटवस्तू तसेच चिमुकल्यांचे खास आकर्षण असलेल्या सांताक्लॉजचा वेश परिधान करून मनोरंजन केले जात आहे. रविवारचा सुटीचा दिवस असल्याने शॉपिंग मॉल्स तसेच सिनेमागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.