मुंबई : शहर-उपनगरातील विविध चर्चमध्ये उत्साहाच्या वातावरणात ख्रिसमस साजरा करण्यात आला. मिडनाइट माससाठी ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये गर्दी केली होती. प्रार्थनेनंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.नाताळनिमित्त केक, चॉकलेट, सांताच्या टोप्या आणि भेटवस्तूंची लयलूट करण्यात आली. परस्परांना शुभेच्छापत्रे देण्यात आली. शहरातील अनेक भागांत सांताक्लॉजने गिफ्ट्स वाटली. शहर-उपनगरातील वांद्रे, माहीम, डॉकयार्ड, विक्रोळी, अंधेरी परिसरात अनेक ख्रिस्ती समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळे या परिसरात ख्रिसमसचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. घरोघरी सजावट करण्यात आली आहे. स्टार लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रभू येशूच्या जन्माचे देखावेही साकारण्यात आले आहेत. ठिकठिकाणच्या चर्चेसमध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित देखावे तयार करण्यात आले होते. अनेक चर्चमध्ये ख्रिसमस कॅरल्सची धून वाजत होती. मॉल्समध्ये सांताक्लॉज स्वागत करीत होते. पार्ट्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजरमुंबईच्या उपनगरांत मोठ्या संख्येने राहणाऱ्या मुंबईकरांनी जोरदार ख्रिसमस सेलीब्रेशन केले. उपनगरांत ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ५५ आणि ख्रिसमसदिवशी ४९ अशा एकूण १०५ पार्ट्यांचे आयोजन केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.पार्टीत दारूचा वापर करायचा असेल, तर उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आवश्यक असते. प्रत्येक पार्टीसाठी परवाना काढताना विभागाला १३ हजार २५० रुपयांचा महसूल मिळतो. अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसांत विभागाने १३ लाख ९१ हजार २५० रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय विनापरवाना पार्टी करणाऱ्या आयोजकांवर धाड टाकून कारवाई करण्यासाठीही विभाग सज्ज असल्याचे उपनगराचे अधीक्षक सुभाष बोडके यांनी सांगितले.
शहरात नाताळची धूम
By admin | Published: December 26, 2015 3:21 AM