Join us

सार्वजनिक शौचालयात चिमुरडीवर बलात्कार

By admin | Published: May 15, 2016 4:45 AM

खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी भांडुपमध्ये घडली.

मुंबई : खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी भांडुपमध्ये घडली. या प्रकरणी वैभव शिंदे (२७) याला पॉस्को आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.भांडुप पश्चिमेकडील प्रतापनगर परिसरात पाच वर्षीय नेहा (नाव बदलले आहे) आई-वडील आणि आजीसोबत राहते. शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास मैदानात खेळायला जाते सांगून, ती घराबाहेर पडली. त्या वेळी शिंदे याने नेहाला आइसक्रीम देण्याचे आमिष दाखवून तेथील सार्वजनिक शौचालयात नेले. आतून दरवाजा बंद करून शौचालयातच नेहावर लैंगिक अत्याचार केले. नेहा मदतीसाठी विनवणी करत होती; मात्र तिची हाक पोहोचू नये म्हणून या नराधमाने तिचे तोंड हाताने दाबून ठेवले होते. विकृत नराधमाची वासनेची भूक भागल्यानंतर त्याने नेहाला घराकडे सोडले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.रात्री साडे नऊच्या सुमारास घरी परतलेल्या आईचे एका कोपऱ्यात निपचित पडलेल्या नेहाकडे लक्ष गेले. आईने नेहाकडे विचारणा केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी शनिवारी सकाळी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वैभवविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पॉस्को आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वैभवला १७ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वैभव हा बेकार असून, त्याचे लग्न झालेले नाही. त्याच परिसरात तो कुटुंबीयांसोबत राहतो. झालेल्या प्रकारानंतर नेहा मानसिक दडपणाखाली आहे. (प्रतिनिधी)