मुंबई : बारावी निकालाची घोषणा झाल्याने आता मिशन अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांची लढाई सुरू होणार आहे. यंदा राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी मुंबईतील नामांकित कॉलेजांच्या वाढलेल्या निकालाने महाविद्यालयांच्या एफवाय प्रवेशाचा मार्ग खडतर झाला आहे. बहुतांश नामांकित कॉलेजांचा निकाल यंदा १०० टक्के लागल्याने ‘एफवाय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परिणामी मुंबईतील नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी असणारी चुरस वाढणार आहे. तर दुसरीकडे एफवाय प्रवेशाचा कटआॅफही दोन ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही टक्क्यांनी घसरला असला तरी निकालाची गुणवत्ता मात्र कायम राहिली आहे. यंदा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,०२,५५२ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये वाढ झाली आहे. यात भर म्हणजे ९० ते ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे एफवाय प्रवेशासाठी यंदाही कांटे की टक्कर असणार आहे. त्यातच कॉमर्स विद्यार्थ्यांनी ९०चा टप्पाही पार केला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे.
नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:09 AM