मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून रेल्वे प्रवासी चर्नीरोड स्थानकातील पुलाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे त्रस्त आहेत. चर्नीरोड स्थानकाला लागूनच पूर्वेला असणाऱ्या पुलावर (चर्चगेटच्या दिशेने) मोठमोठे खड्डे पडले असून, पुलाच्या पायऱ्याही तुटलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या स्थानकातून रोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. चर्चगेटच्या दिशेला असलेल्या तिकीटघराबाहेरच पुलावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागतो. तिकीट काढण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना तर कसरतच करावी लागते. या तिकीटघराच्या पुढे पूल पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे उतरतो. या ठिकाणीही पुलाची दुरवस्था झालेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुलावर खड्डे पडले असून, भेगाही गेल्या आहेत. तरीही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.पश्चिमेकडे उतरणाऱ्या पुलावरच्या काही फरशा निघाल्या आहेत. पूर्वेकडून हा पूल गिरगाव चौपाटीला जात असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, गिरगावकर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करतात. पुलाच्या खड्ड्यांचा त्रास त्यांना रोज सहन करावा लागतो. पुलाच्या पायऱ्या मार्बलच्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र या पायऱ्याही तुटलेल्या असल्याने त्या बसवून काहीएक फायदा झालेला दिसून येत नाही. पावसाळ्यात पाणी साचल्याने या पायऱ्या निसरड्या होतात. येथील काही पायऱ्यांचा आधार निसटला आहे. सकाळ व संध्याकाळी या पुलावर गर्दी असते. पुलाच्या दुरवस्थेमुळे येथे किरकोळ अपघात होण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)
चर्नीरोड पुलाची दुरवस्था
By admin | Published: July 11, 2016 3:28 AM