देवेंद्र फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनची होणार सीआयडी चौकशी, दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:07 PM2022-03-14T18:07:03+5:302022-03-14T20:03:01+5:30
Dilip Walse patil : प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिला असून सरकारने तो मान्य केला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवत असल्याचं गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत एक पेन ड्राईव्ह विधीमंडळात सादर केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आरोपांना उत्तर देत या स्टिंग ऑपरेशनबद्दल बोलताना त्यांनी तुमचा आरोप काहीही असला तरी मी कुणाची पाठाराखण करणार नाही. मी तपासले की, या मागे कोण आहे, दोषी कोण आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची? हे पाहणार आहोत. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, फडणवीसांनी मागेही एक पेन ड्राईव्ह दिला होता, दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह दिला, आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह दिला. आपण एक डिटेक्टीव्ह एजन्सी तयार केली की काय? असा प्रश्न वळसे पाटलांनी विचारला. त्याचप्रमाणे प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिला असून सरकारने तो मान्य केला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवत असल्याचं गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठिशी कोण आहे का? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे. सत्ता येते सत्ता जाते, पण वातावरणात नुसती सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. सत्ता गेल्यामुळे जी अस्वस्थता आहे ती चांगली नाही असे देखील पुढे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सीआयडी ऐवजी सीबीआयकडे द्यावं अशी मागणी करत सभा त्याग केली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे न दिल्यास आम्ही कोर्टात जाऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.