लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहआयुक्त महेश आहेर यांची सीआयडी मार्फत स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. आहेर यांची शैक्षणिक पात्रताही तपासली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
गृह खात्याच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना आव्हाड यांनी महेश आहेर यांचे कथित कारनामे विधानसभेत मांडले. ठाणे क्राइम कॅपिटल बनल्याचा आरोप त्यांनी केला. एका आमदाराच्या मुलीला आणि जावयाला मारण्याची खुलेआम धमकी दिली जात असेल आणि त्यावर कोणतीही कारवाई होणार नसेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, असा सवाल करताना आव्हाड भावुक झाले होते. एक ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. यात महेश आहेर नावाचा एक सहआयुक्त माझ्या मुलीला आणि जावयाला मारण्याची धमकी देतो. जे जे हत्याकांडातील मुख्य आरोपी सुभाषसिंग ठाकूर याच्याशी आपले सबंध असल्याचे तो सांगतो. त्याला सांगून स्पेनला फिल्डिंग लावायची आणि गेम वाजवायची धमकी हा सहआयुक्त देतो. मात्र, सरकारकडून काहीही कारवाई होत नाही. साधी एक तक्रारही नोंदवली जात नाही. ऑडिओ फॉरेन्सिकला पाठवला आहे एवढेच पोलिस सांगत आहेत. ही एका आमदाराची अवस्था आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.
आहेर यांचे शिक्षण किती? हे आजपर्यंत कुणालाही माहित नाही. मागील पाच वर्ष आम्ही त्याच्या शिक्षणाची माहिती मागतो आहोत. पण, त्याचे शिक्षणाचे प्रमाणपत्र कुणी दाखवत नाही, याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले.
‘मला उडवायची आहेरने सुपारी दिली’
जसबीर सिंग, महेश आहेर आणि फिरोज बाबूची उत्तर प्रदेशला बैठक झाली. त्यात मला मारण्याची सुपारी फिरोज बाबुला दिली. पण जेव्हा त्याला कळले की जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीलाही मारायचे आहे. तेव्हा तो माझ्याकडे आला आणि त्याने मला हे सगळे सांगितले, असे आव्हाड यावेळी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"