मुंबई : लाखो रुपये घेऊन मुंबई पोलिसांच्या शस्त्र परवान्यासह स्टार्टर पिस्तुले विकण्याचे मुंबईतील प्रकरण उघडकीस येऊन साडेपाच वर्षे उलटली तरी याबाबत सखोल चौकशी होत नसल्याने राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेने केलेल्या मागणीनुसार हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याची सूचना उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. मुलुंड येथे कार्यालय असलेली अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती ही संघटना त्यांचे पदाधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना शस्त्रे आॅफर करीत होती. संघटनेत दाखल झाल्यास पाच लाख रुपयांमध्ये मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून देण्यात येणाऱ्या शस्त्र परवान्यासह एक परदेशी स्टार्टर बनावटीचे शस्त्र देण्यात येत असे. शस्त्रांचा हा बाजार मालाड येथील रहिवासी राष्ट्रीय अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी उघडकीस आणला होता. मोहन कृष्णन आणि त्यांचे सहकारी कन्नन अय्यर यांनी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ याच्याशी संपर्क साधला होता. शेठ याने त्यांना संघटनेचे पद आॅफर करून परदेशी बनावटीचे शस्त्रही देण्याची तयारी दर्शवली होती. अय्यर यांच्याकडून शेठ याने अडीच लाख रुपये घेऊन त्यांना संघटनेचे राज्य सचिवपद बहाल केल्याचे प्रमाणपत्र दिले. जर्मन बनावटीचे रिव्हॉल्व्हरही दिले. कृष्णन यांच्याकडून ५0 हजार रुपये आगाऊ आणि साडेचार लाखांचा धनादेश घेत त्यांनाही संघटनेचे सचिवपदाचे प्रमाणपत्र आणि अमेरिकन बनावटीचे रिव्हॉल्व्हर दिले होते. (प्रतिनिधी)
शस्त्रविक्री प्रकरणाची सीआयडी चौकशी करा
By admin | Published: February 07, 2017 4:28 AM