लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करा, मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:58 AM2017-09-07T02:58:39+5:302017-09-07T02:58:56+5:30
चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या विशाल सरडे याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची सीआयडीमार्फत चौकशी करून त्याची सुटका करण्यात यावी
मुंबई : चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या विशाल सरडे याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची सीआयडीमार्फत चौकशी करून त्याची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आरोपी राहात असलेल्या परिसरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांना सादर केले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे निर्दोष तरुणाला अटक करण्यात आल्याचाही आरोप या नागरिकांनी केला आहे.
मालाड (पूर्व) येथील सेठ जुगीलाल पोद्दार अॅकॅडमीत नर्सरीमध्ये शिकणाºया मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार तिच्या आईने दिंडोशी पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी धरणे धरून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर काही स्थानिक राजकीय नेत्यांनीही दबाव आणल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र आरोपी सरडे हा निर्दोष असून, या प्रकरणातील तपासात अनेक मुद्दे वादग्रस्त असल्याचा आरोप करीत सरडे याला ओळखणाºया रहिवाशांनी हे निवेदन तयार केले आहे. या प्रकरणात मुलीची वैद्यकीय तपासणी सरकारी डॉक्टरांमार्फत होणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी वारंवार खाजगी डॉक्टरांद्वारेच वैद्यकीय तपासणी केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरण हस्तगत केले आहे. या चित्रीकरणात कोणताही ठोस पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. पीडित मुलीकडून आरोपींची ओळख परेड करताना तपास अधिकाºयांनी केवळ आरोपीला तिच्यासमोर उभे केले आणि इतर शिपायांना दुसºया रूममध्ये ठेवले, हाही मुद्दा आक्षेपार्ह असल्याचे निवेदनात नमूद आहे.
याबाबत राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवजाला पाडा परिसरात राहणाºया सरडे याला येथील रहिवासी अनेक वर्षांपासून ओळखतात. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही, असे नमूद करीत बलात्कारातील आरोपीला तुरुंगातील अन्य कैदी मारहाण करतात. काही वेळा आरोपी दोषी असल्याचे गृहीत धरून निरपराध आरोपींनाही अशा प्रकारे मारहाण होते. असा प्रकार अमानवीय असल्याने या प्रकरणाची तटस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून निर्दोष सरडे याची मुक्तता करण्यात यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.