धोकादायक इमारतींकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: July 25, 2015 10:35 PM2015-07-25T22:35:11+5:302015-07-25T22:35:11+5:30
नवीन पनवेलमधील सिडकोने उभारलेल्या काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. सेक्टर १७ मध्ये सिडकोकडून १९८५ साली पीएल ६/१३, ६/२१ इमारती उभारण्यात आल्या.
- वैभव गायकर, पनवेल
नवीन पनवेलमधील सिडकोने उभारलेल्या काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. सेक्टर १७ मध्ये सिडकोकडून १९८५ साली पीएल ६/१३, ६/२१ इमारती उभारण्यात आल्या. मात्र सध्या याठिकाणी कोणीही राहत नसल्याने सर्रास अनैतिक प्रकार सुरू आहेत. या इमारतींची मालकी असलेल्या कंपन्यांसह सिडकोचेही इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पीएल ६ अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने या धोकादायक इमारतीबाबत सिडकोसह संबंधित कंपनी मालकांकडे पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कारवाई झालेली नाही.
नवीन पनवेल सेक्टर १७ मधील पीएल ६ ओनर्र्स असोसिएशन अपार्टमेंटमध्ये एकूण १२ रहिवासी इमारती आहेत. यापैकी पीएल ६/१३, ६/२१ या एसबीआय, रामा पेट्रोकेमिकल लिमिटेड, हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्या मालकीच्या असून दुरवस्था झालेल्या इमारतीक डे संबंधित मालक ढुंकूनही पाहत नाहीत. यापैकी रामा पेट्रोकेमिकल लिमिटेड यांना असोसिएशनने पत्र पाठविल्यानंतर त्यांनी याची दखल घेत स्वत:च्या मालकीच्या असलेल्या १ ते ६ क्रमांकाच्या फ्लॅट्सची सुधारणा केली आहे. मात्र याच इमारतीतील वरच्या माळ्याची दुरवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
७ ते १२ क्रमांकांचे फ्लॅट्स हे हिंदुस्थान कॉपर लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे असून ते रहिवाशांच्या जीवाला धोकादायक ठरत आहेत. चार दिवसांपूर्वीच याठिकाणावरून सिमेंटचा कठडा खाली पडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एसबीआयच्या मालकीच्या या इमारतीही मोडकळीस आलेली आहे.
गैरप्रकारांची शक्यता
सिडको व संबंधित इमारतीच्या मालकांना जानेवारी २०१४ मध्ये पीएल ६ अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने पत्र देऊनही दीड वर्ष उलटले तरी या ठिकाणच्या सुरक्षेबाबत संबंधित कानाडोळा करीत आहे. जवळच रेल्वे स्थानक असल्यामुळे गैरप्रकार वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित इमारतीची मालकी ज्या कंपन्यांकडे आहे त्यांनी या संबंधी उपाययोजना राबविल्या पाहिजेत. ही संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे. आमच्या विभागाला कोणतेही पत्र प्राप्त झाले नसून या संबंधात माहिती घेऊन मालकी असलेल्या कंंपनीशी पत्रव्यवहार केले जाईल.
- प्रदीप तांबडे (मुख्य अभियंता, सिडको नवीन पनवेल )