Join us  

सिडको इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले

By admin | Published: June 16, 2014 3:21 AM

नेरूळ येथील सिडकोने बांधलेल्या इमारतीतील एका घरातील छताचे प्लास्टर कोसळले. सेक्टर ४८ येथील एनएल टाईप इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली

नवी मुंबई: नेरूळ येथील सिडकोने बांधलेल्या इमारतीतील एका घरातील छताचे प्लास्टर कोसळले. सेक्टर ४८ येथील एनएल टाईप इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील रहिवाशांत मात्र घबराहटीचे वातावरण पसरले आहे.साईसंगम सोसायटीतील इमारत क्रमांक डी ४८ मधील निगदळे यांच्या फ्लॅट क्रमांक १४ मध्ये सिडकोच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मोडकळीस आलेल्या बेडरूमच्या सिलिंगची दुरुस्ती सुरू असताना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक हॉलच्या छताचे पन्नास टक्के प्लास्टर निखळून खाली पडले. यामुळे एकच घबराहट पसरली. सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचे वृत्त समजताच माजी नगरसेवक भरत जाधव व इतरांनी दुर्घटनाग्रस्त घराला भेट देवून पाहणी केली. या घटनेनंतर सिडकोच्या निकृष्ट इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही घटना घडल्याने सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीतून राहणाऱ्या रहिवाशांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नेरूळच्या सेक्टर ४६ व ४८ मध्ये सिडकोने बांधलेल्या जवळपास २५0 इमारती आहेत. ३२ गृहनिर्माण सोसायट्यांतून विभागलेल्या या इमारतीत जवळपास चार हजार सदनिका असून त्यातून सुमारे पंचवीस हजार रहिवासी राहतात. या सर्व इमारती राहण्यास धोकादायक बनल्या आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर सिडकोने या परिसरातील काही इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक तेथे दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. आतापर्यंत जवळपास शंभर प्लॅट्समधून दुरुस्ती करण्यात आली आहे. असे असले तरी आजच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केवळ इमारतीचीच नव्हे, तर या इमारतीमधील प्रत्येक घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून गरजेनुसार दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी भरत जाधव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)