प्रवाशांना मोठा दिलासा! मेट्रो प्रवास स्वस्त झाला, तिकीट दरांत ३३ टक्के कपात; पाहा, नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 06:55 PM2024-09-05T18:55:58+5:302024-09-05T18:57:07+5:30
Metro Ticket Fare Rate to 33 Percent: गणपतीपासून हे नवे दर लागू होणार असून, यामुळे प्रवाशांना मोठा लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
Metro Ticket Fare Rate to 33 Percent: मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामे सुरू आहेत. आताच्या घडीला मुंबईत मेट्रोचे काही मार्ग सुरू आहेत. तर काही मार्ग येत्या काही महिन्यात सुरू होतील, असे सांगितले जात आहे. मुंबई उपनगरांसह ठाणे, मीरा-भाईंदर हे सर्व भाग एकमेकांशी जोडले जाणार आहे. मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. यातच आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मेट्रोचे तिकीट दर ३३ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांना लोकल आणि मेट्रोचा प्रवास नित्याचा आहे. मेट्रो तिकीट महाग असल्याने अनेकदा प्रवासी मेट्रोपेक्षा लोकलला प्राधान्य देतात. आता मेट्रोमध्येही प्रवाशांची गर्दी वाढत चाललेली पाहायला मिळत आहे. मेट्रो प्रवास लाखो मुंबईकरांची गरज बनली आहे. यातच आता सिडकोनेनवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणपतीपासून नवे दर होणार लागू
सिडको महामंडळाने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या ० ते २ कि.मी. आणि २ ते ४ कि.मी. करिता रुपये १० रुपये, पुढील ४ ते ६ कि.मी. आणि ६ ते ८ कि.मी.साठी २० रुपये आणि ८ ते १० कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता ३० रुपये, असे तिकीट दर लागू होणार आहेत. बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता याआधी तिकिटांचा दर ४० रुपये होता, हाच तिकीट दर आता ३० रुपये असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. ०७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर १० रुपये व कमाल तिकीट दर ३० रुपये असेल. जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.