मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सरकारी अधिकारी, पोलीस दलातील कर्मचारी व आरोग्य सेवेतील अधिकारी सेवा बजावत आहेत. त्यांना सिडकोच्या माध्यमातून घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता बुक माय सिडको होम योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध आहेत.या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ८४२ सदनिका, अल्प उत्पन्न गटातील १३८१ सदनिका आणि पोलिसांसाठी अल्प उत्पन्न गटातील १४८२ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांची किंमत १९.८४ लाख ते २१.५६ लाख रुपये, तर अल्प उत्पन्न गटातील सदनिकांची किंमत २७.९४ लाख ते ३१.४३ लाख रुपये इतकी असेल. या योजनेत आरोग्यसेवा संबंधित कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी यांचा समावेश असेल, असे शिंदे यांनी सांगितले.
वारसांनाही मिळणार घराचा लाभकोरोनाकाळात या सर्व घटकांनी अतुलनीय सेवा बजावली आहे. काहींना प्रसंगी जीवही गमवावा लागला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन तिचा योग्य सन्मान केला पाहिजे, या भावनेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कोरोना योद्ध्याचा आकस्मिक मृत्यू झाला असल्यास त्याची पती/पत्नी अथवा वारसासही या घरांचा लाभ मिळेल.